पेट्रोल १३ पैशांनी महागले, तर डिझेल झाले स्वस्त

नवी दिल्ली : देशभरात बुधवार मध्यरात्रीपासून पेट्रोल महागले असून डिझेलच्या दरात मात्र कपात करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू करण्यात आले असून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १३ पैशांनी वाढ केली आहे. तर डिझेलचे दर प्रतिलिटर १२ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतारामुळे हा किरकोळ बदल करण्यात आल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी (आज) गुरुवार पासून लागू होणार आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या आढाव्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

नोटाबंदीमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कच्चा तेलाची किंमत आणि डॉलरचा दर याकडे लक्ष असून त्यानुसार आगामी काळातही दरात बदल केले जातील असं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे.