पहिल्या कमाईतून भरलं बाइकमध्ये पेट्रोल

Advait Dadarkar

प्रत्येकाच्याच आयुष्यात त्याची पहिली कमाई अगदी खास असते. अहं, बक्षीस नव्हे तर त्याने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळालेली पहिली रक्कम वेगळाच आनंद देते. कुणी या पहिल्यावहिल्या कमाईतून आपल्या आईवडिलांना भेट देतो तर कुणी स्वत:ची हौसमौज करतो. पहिल्या कमाईचा चेक किंवा नोट देवाजवळ ठेवण्याची तर परंपराच आहे. आज लाखांनी पैसा मिळवणाऱ्यांना त्यांची पहिली कमाई कधीच विसरता येत नाही; कारण तीच तर सुरुवात असते स्वावलंबनाची. सेलिब्रिटी कलाकारांच्या संघर्षमय प्रवासातही पहिल्या कमाईचे अनेक किस्से आपण ऐकतो. असाच एक किस्सा अभिनेता अद्वैत दादरकर (Advait Dadarkar) याने शेअर केला आणि त्याने पहिल्या कमाईतून काय केले हे ऐकून त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं.

एका नाटकाच्या प्रयोगासाठी अद्वैतला शंभर रुपये मिळाले आणि प्रयोग सुटल्यानंतर घरी जाताना त्या कमाईच्या पैशातून अद्वैतने बाइकमध्ये पेट्रोल भरले होते. टीव्हीवर गाजत असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सौमित्रची आणि सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये पिंकीची भूमिका करत असलेला अद्वैत दादरकर म्हणजे नाटक आणि मालिका या दोन्ही माध्यमाची नस अचूक टिपणारा कलाकार. नवऱ्याची बायको मालिकेच्या गुरुनाथ या ग्रे शेड असलेल्या नायकाला वरचढ चढणारी सौमित्रची भूमिका चपखल वठवत अद्वैतने फॅनक्लबची कमानही चढती ठेवली आहे. एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला की, सौमित्र ही भूमिका हिट झाल्यानंतर मुलींकडून फ्रेंड रिक्वेस्ट वाढल्या का? यावर त्याने दिलेले उत्तरही भन्नाट होते.

मुळात सौमित्र हा राधिकाच्या आयुष्यात आला तेव्हा राधिकाच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. अशा वयाच्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सौमित्र हे पात्र खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया अद्वैतकडे आल्या. चाळिशीच्या उंबरठ्यावर महिलांना एका अशा मित्राची गरज असते असंही कित्येक गृहिणींनी त्याला बोलूनही दाखवल्याचं तो सांगतो. त्यामुळे तरुण मुलींपेक्षा त्यांची आईच अद्वैतची चाहती झाली. एकाच वेळी मालिकेतील सौमित्र हे पात्र, चला हवा येऊ द्या शोमध्ये सेलिब्रिटी पॅटर्नमधून कॉमेडी आणि युवा डान्सिंग क्विन शोचे निवेदन अशा तीन लढाया अद्वैतने लढवल्या. पण हा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी अभिनय येत नाही म्हणून नाटकातून अद्वैतला काढून टाकले होते.

पण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत एका नाटकासाठी दोन महिन्यांच्या तालमीत अद्वैतने जे काही धडे गिरवले त्याने त्याचा अभिनयात करिअर करण्याचा निर्णय पक्का झाला. अभिनयात संवाद सहजपणे म्हणण्याचे कसब आणि दोन वाक्यांतील पॉझ याला अद्वैत खूप महत्त्व देतो. पण अद्वैतने अभिनयाकडे वळण्याआधी अनेक वाटा धुंडाळून पाहिल्या आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. अगदी सुरुवातीला अद्वैतच्या डोक्यात क्रिकेटचे वेड आले. सरावासाठी साहित्याचा लवाजमा घेऊन तो मैदानावर आठवडाभर रमला; पण हे काही आपल्याला जमणार नाही हे कळल्यावर तंबूत परतला. मग त्याला नाटक खुणावू लागले.

पण नाटकातून काढल्यानंतर तो खट्टू झाला आणि विंगेत गेला. त्याचा भाऊ छान गायचा. त्याला पाहून अद्वैतला वाटले की, आपण गायक बनूया. पण तोही सूर काही लागला नाही. वाद्य वाजवायला यायला हवं असं वाटल्याने अद्वैतने कीबोर्ड शिकायला सुरुवात केली. सहा महिन्यांत कीबोर्ड वादनाच्या तारा दुरावल्या. त्यानंतर एका शिबिरात नाटक, अभिनय याचे संस्कार झाले तेव्हा मात्र नाटक हाच आपला प्रांत आहे हे त्याला कळून चुकले. नाटक लिहायला जमलं, दिग्दर्शनाचं तंत्र समजलं. तेव्हापासून अद्वैत आणि नाटक यांची गट्टी जमली.

अभिनय, लेखन, दिग्दर्शन असा तिहेरी प्रवास करत अद्वैतची वाटचाल मस्त सुरू झाली. आज सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना त्याला पहिली कमाई आठवली आणि त्या कमाईतून बाइकमध्ये पेट्रोल भरल्याच आठवण त्याच्या ओठावर आली. मुंबईच्या दादरमध्ये बालपण गेलेल्या अद्वैतचे शालेय शिक्षण बालमोहन तर महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले. रूपारेलमध्ये नाटकाचे ग्रुप असल्याने त्याच्यातील नाट्य कलाकार बहरला.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन तसेच ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या नाटकांचे दिग्दर्शन अद्वैतने केले आहे. तर ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील नारद, ‘शुभंकरोती’ मालिकेतील शशांकच्या भूमिकेतूनही तो भेटला. सध्या सौमित्र बनहट्टी बनून राधिकाच्या आयुष्यात सुख आणणाऱ्या सौमित्रमधून तो फेमस झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER