पेट्रोल, डिझेलचे दर अचानक स्थिर

- रोजचे बदल थांबविल्याची चिन्हे

Petrol_Price

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या आधारे पेट्रोल, डिझेलच्या किंमती ठरविण्याच्या पद्धतीपासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सध्या फारकत घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर सध्या स्थिर दिसत आहेत. मुंबईत लिटरमागे पेट्रोलचा दर ७७.४५ रुपये असून डिझेलचा दर ६८.३२ रुपये आहे. त्यात काही दिवसांपासून बदल झालेला नाही.

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत फार कमी वेळा बदल केला. या तीन महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर किमान ४३ दिवस तर, डिझेलचे दर ४७ दिवस स्थिर होते. डिझेलच्या किंमतींमध्ये सलग १३ दिवस कुठलाही बदल करण्यात आला नव्हता. तर, पेट्रोलच्या किंमती सलग ८ दिवस स्थिर होत्या. बाजारभावानुसार किंमती ठरविण्याची पद्धत सुरू झाल्यापासून सलग इतके दिवस दर स्थिर राहण्याचा हा एक प्रकारचा विक्रमच मानला जात आहे.

याआधी दर १५ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा आढावा घेतला जात असे. मोदी सरकारच्या तीन वर्षे ही पद्धत सुरू होती. जून २०१७ पासून दररोज दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निवडणुकांचा काळ वगळता तेल कंपन्यांनी जवळपास रोजच किंमतींचा आढावा घेतला आहे. ती पद्धत गेल्या काही दिवसांपासून खंडित होताना दिसत आहे. हा सध्या तरी वाहन चालकांना दिलासा असल्याचे दिसून येत आहे.