कोरोना लसीकरणात वकिलांना प्राधान्य देण्यासाठी याचिका

Coronavirus Vaccine - Lawyers - Bombay High Court

मुंबई : वकील (Lawyer) आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचाही ‘फ्रंटलाइन वर्कर्स’मध्ये समावेश करून कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहिमेत त्यांनाही प्राधान्य देण्याचा सरकारला आदेश द्यावा,  अशी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) करण्यात आली आहे. वैष्णवी घोळवे आणि योगेश मोरबाळे या रायगड जिह्यातील दोन वकिलांनी ही याचिका केली आहे.

पुढील आठवड्यात याचिका प्राथमिक सुनावणीसाठी येण्याची अपेक्षा आहे. वकिलांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ न मानणे हा पक्षपात आहे, असे प्रतिपादन करत याचिका म्हणते की, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, पालिकांचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्ते यांच्याएवढाच वकिलांनाही कोरोना विषाणूची लागण होण्याचा मोठा धोका आहे. न्यायव्यवस्था हेही सरकारचे एक महत्त्वाचे कर्तव्य असून ते सुरळीतपणे चालू राहण्यात न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी यांच्याप्रमाणेच वकीलवर्गाची भूमिकाही महत्त्वाची आहे.

याचिका म्हणते की, ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध सुरू  असतानाही न्यायालयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी सुरू ठेवली. ग्रामीण भागांत अशी सोय नसूनही वकिलांनी दूरवरून येऊन न्यायालयात प्रकरणे चालविली. आता कोरोनाची नव्याने लागण होण्याचे प्रमाण राज्यात वाढत असताना इतर ‘फ्रंटलाइन वर्कर्स’प्रमाणेच वकिलांनाही लसीकरणाची गरज आहे. वकिलांना यापासून वंचित ठेवणे हा सुरक्षित आयुष्य जगण्याच्या त्यांच्या मूलभूत हक्कावर घाला आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER