सुशांत सिंगच्या मृत्यूचा तपास लवकर संपविण्यासाठी याचिका ‘सीबीआय’ (CBI) ला वेळेचे बंधन घालण्याची विनंती

CBI & Shushant Singh Rajput & SC

नवी दिल्ली : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या रहस्यमय मृत्यूचा तपास पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश केंद्रीय गुप्तचर विभागास (CBI) दिला जावा, अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.

पुनित कौर आणि अ‍ॅड. विनित धांडा या मुंबईतील दाम्पत्याने ही याचिका केली आहे. याचिका म्हणते की, सुशांत सिंगचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी त्याच्या कुटुंबियांच्या तसेच जगभरातील चाहत्यांच्या मनात कमालीची उत्कंठा आहे. तपासातून काहीच ठोस निष्पन्न होत नसल्याने ही उत्त्कंठा शमण्याऐवजी समाजमाध्यमांत अनेक प्रकारच्या कट-कारस्थानांच्या सांगोवांगी कथांना ऊत आला आहे. यामुळे सुशांतवर प्रेम करणारे आणखी व्यथीत होत आहेत.

याचिकाकर्ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने एका ठराविक हेतून व मोठ्या विश्वासाने या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला. तो आदेश देऊन चार महिने उलटून गेले तरी ‘सीबीआय’ने तपासासंबंधीचा कोणताही अहवाल न्यायालयात सादर केलेला नाही. एरवी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही तीन महिन्यांत आरोपपत्र दाखल केले जाते. पण देशाची अग्रगण्य तपासी संस्था गेले चार महिने कोणता तपास करत आहे व त्यातून काय निष्पन्न झाले याची पुसटशी माहितीही सुशांतच्या चाहत्यांना मिळू शकलेली नाही.

तपास पूर्णत्वास नेण्यातील ‘सीबीआय’ची ही दिरंगाई यापुढे चालू न देता त्या तपासी संस्थेला जास्तीत जास्त पुढील दोन महिन्यांत तपास पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER