भाविकांना मंदिरांतून ‘प्रसाद’ नेऊ देण्यासाठी जैन समाजाच्या याचिका

Bombay High Court

मुंबई : ‘अयम्बिल तप’ या जैन समाजाच्या (Jain Community) धार्मिक उत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये शिजवलेल्या जेवणाचा ‘पवित्र प्रसाद’ भाविकांना पार्सलच्या स्वरूपात घेऊन जाण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील दोन प्रमुख जैन मंदिरांच्या ट्रस्टनी उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत.

‘श्री आत्मन कमल लब्धीसुरिश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट‘ आणि ‘शेठ मोतीशा रिलिजियस अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट‘ने या याचिका केल्या आहेत. अ‍ॅड. प्रफुल्ल शहा यांनी विनंती केल्यानंतर याचिकांवर न्या.एस. सी. गुप्ते व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर तातडीची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आम्हाला रास्त वाटते. ते मंदिरे उघडण्याची परवानगी मागत नाहीत. फक्त भाविकांना मंदिरांमधून प्रसादाची पार्सल नेऊ देण्याची परवानगी त्यांना हवी आहे, असे म्हणून खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर देण्यास सांगितले.

‘अयम्बिल तप’ १९ ते २७ एप्रिल असे नऊ दिवस आहे. अ‍ॅड. शहा म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही अशाच याचिका केल्या तेव्हा न्यायालयाने मंदिरांमधील भोजनालयांमध्येच, कोरोनाचे निर्बंध पाळून, भाविकांना प्रसादाचे जेवण वाढण्यास परवानगी दिली होती. खास वस्तूंचा वापर करून हे प्रसादाचे जेवण मंदिरातील आचारी तयार करत असल्याने भाविकांना ते आपल्या घरी शिजवणे शक्य नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले.

परंतु राज्य सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार मंदिरे उघडी ठेवण्यास परवानगी नाही, असे न्यायमूर्ती म्हणाले. त्यावर अ‍ॅड. शहा म्हणाले, ग्राहकांना जेवणाची व खाद्यपदार्थांची पार्सल नेण्यासाठी हॉटेल्स उघडी ठेवू द्यायची, पण मंदिरांना मात्र प्रसादाची पार्सल्स देण्याची बंदी करायची हा दुर्दैवी पक्षपात आहे.

जेवणाची सुटी होण्यापूर्वी खंडपीठाने सरकारी वकिलांना याचिकेवर सरकारचे उत्तर कळविण्यास सांगितले होते. जेवणाची सुटी सुरू होण्याआधी सरकारी वकिलाने सरकारची भूमिका स्पष्ट केली. पार्सल नेण्याच्या निमित्ताने मंदिरांबाहेर गर्दी जमेल. त्यामुळे सरकार याला राजी नाही, असे कळविण्यात आले. सरकारी वकिलाचे म्हणणे असे होते की, रमझानच्या महिन्यात जुम्मा मशिदीत येऊन दिवसाचे पाच नमाज पढू देण्यास बुधवारी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षपाताचा संशय घेण्यास जराही जागा राहू नये, असे सरकारला वाटते.

त्यावर न्या. गुप्ते यांनी जैन समाजातील कार्यकर्त्यांनी प्रसादाच्या जेवणाची पार्सल्स भाविकांना नेऊन द्यावीत, असा पर्याय सुचविला. ते अ‍ॅड. शहा यांना म्हणाले की, ‘स्विगी’ आणि ‘झोमॅटो’ फोनवर तसेच ऑनलाईन ऑर्डर घेऊन जसे पदार्थ आणून देतात तशी काही तरी व्यवस्था करता येईल. तुमच्या समाजातील उद्यमशीलता व कल्पकता पाहता तुम्हाला यासाठी स्वयंसेवक मिळणे कठीण पडणार नाही, असे वाटते.

दोन्ही बाजूंना चर्चा करून काही व्यवहार्य तोडगा काढण्यास सांगून पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button