सौदीमध्ये ‘चुकून’ दफन केलेले प्रेत भारतात परत आणण्यासाठी याचिका

Delhi high Court - maharastra Today
  • मृताच्या धर्माच्या चुकीच्या उल्लेखाने झाली गडबड

नवी दिल्ली : नोकरीनिमित्त सौदी अरबस्तानात गेलेल्या आपल्या पतीचे तेथे ‘चुकून’ दफन केले गेलेले पार्थिव रीतसर अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतात परत आणण्याकरता एका हिंदू विधवेने दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे. अंजू शर्मा नावाच्या या विधवेच्या याचिकेत भारत सरकार व परराष्ट्र मंत्रालयास प्रतिवादी करण्यात आले आहे. पतीवर धार्मिक रिवाजांनुसार अंत्यसंस्कार न करता येण्याने आपला मुलभूत हक्क डावलला जात आहे, असे या विधवेचे म्हणणे आहे. तरी सौदी अरबस्तानात दफन केले गेलेले आपल्या पतीचे पार्थिक पुन्हा उकरून भारतात आणण्याची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत व ज्या अधिकार्‍यांच्या चुकीमुळे पार्थिव तेथे दफन केले गेले त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून कारवाई केली जावी, अशी या विधवेची न्यायालयास विनंती आहे.

अंजू शर्मा याचिकेत म्हणतात की, माझ्या पतीचे मधूमेह,उच्च रक्तदाब व हृदयक्रिया बंद पडून दोन महिन्यांपूर्वी सौदी अरबस्तानातील जिझान येथील इस्पितळात निधन झाले. पतीचे शव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणण्याच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण केल्या. परंतु प्रत्यक्ष पार्थिव ताब्यात घेण्यासाठी गेलो तेव्हा त्या मृतदेहाचे आधीच दफन करण्यात आल्याचे सांगण्यात आले

याचिका म्हणते की, असे कसे काय होऊ शकते? याविषयी जेद्दा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाकडे (Indian Consulate) चौकशी करता असे सांगण्यात आले की, अरबीमधील कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करणार्‍या दूतावासातील अधिकृत भाषांतरकाराने मृताचा धर्म चुकीने ‘हिंदू’ ऐवजी ‘मुस्लिम’ असा लिहिल्याने ही गडबड झाली. अंजू शर्मा म्हणतात की, सौदी अरबस्तानच्या अधिकार्‍यांकडे पाठपुवा करून दफन केलेले पार्थिव कबरीतून पुन्हा बाहेर काढून भारतात पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना केली. पण गेल्या सात आठवड्यांत त्यांच्याकडून कोणतीच हालचाल न झाल्याने नाईलाजाने न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER