प्रीतम मुंडेंची खासदारकी जाणार?

Pritam Munde

बीड:बीड मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडे देण्यात येणा-या शपथपत्रात त्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कालिदास आपेट यांनी वकिलांमार्फत प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

प्रीतम मुंडे यांच्यावर आपेट यांनी अनेक आरोप लावले आहेत.

ही बातमी पण वाचा : नितीन गडकरींची खासदारकी धोक्यात ; नाना पटोलेंनी केली याचिका दाखल

‘प्रीतम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत त्यांचे नाव असताना मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावानेही त्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा आरोप कालिदास यांच्याकडून करण्यात आला आहे. मुंबईतील वरळी येथील प्लॉट १२०१ स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाची दोन ओळखपत्रे आहेत,  असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती त्यांनी लपवली, असंही आपेट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्याबाबत या चार मुख्य आक्षेपांसह एकूण सहा आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास प्रीतम मुंडे यांचं पद धोक्यात येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत प्रीतम यांनी राष्ट्रवादीवर मोठा विजय मिळवला.  राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला.

ही बातमी पण वाचा : छोट्या दुकानदारांनो चिंता नाही, मिळणार पेन्शन