शनिवारवाड्याजवळ आढळली पेशवेकालीन जलवाहतूक रचना

Maharashtra Today

पुणे :- शनिवारवाड्याच्या शेजारील रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात काही फुटखाली पाण्याचा साठा आढळला आहे. पालिकेकडून अप्पा बळवंत चौकाकडून पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. ही पेशवेकालीन जलवाहतूक रचना (Peshwa-era water transport structure )असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शनिवारवाड्यात पेशव्यांचे वास्तव्य होते. त्याकाळी पेशव्यांनी कात्रज येथे तलाव बांधले होते. त्यातून कात्रजहून शहरातील पेठांसह विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात येत होता.

शनिवारवाड्याच्या पश्‍चिम-उत्तरेकडच्या कामात वाहते पाणी आढळले. १७४९ साली नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून पुण्याकडे पाणी आणले होते. १९२० पर्यंत या पाण्याचा वापर सुरू होता. पाणी दगडी आणि खापराच्या नळांतून वितरित होत होते. हे त्या जल वितरणाचे भाग असल्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले.

नानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे दोन तलाव बांधले होते. भुयाराप्रमाणे बंदिस्त बांधकाम करून शहरात खापराच्या पाइपने हे पाणी शनिवारवाडा, वेगवेगळ्या हौदांमध्ये नागरिकांसाठी आणि सरदारांच्या घरांसाठी पोहोचवण्यात येत होते. शनिवारवाड्यात गणेश दरवाजाजवळ या पाण्याचा साठा होता. त्यातून पाणी शनिवारवाड्याला मिळायचे. २५० ते २४५ वर्षांपूर्वी ही भारतातील बंदिस्त आणि आधुनिक नळ व्यवस्था होती. आजही हे पाणी कात्रजहून येते आहे.

मागील काही वर्षांपर्यंत पेठांतील सार्वजनिक हौदांतील पाणी नागरिक वापरत होते. विविध कामांमुळे भुयारांचे छत ढासळले होते. याठिकाणी पुन्हा स्लॅब बांधण्यात येत आहे. शनिवारवाड्याजवळ यापूर्वीदेखील भुयाराचे छत ढासळले होते. आज शहरात पिण्याचे पाणी अन्य कारणांसाठी वापरत आहोत. या पाण्याचा सरकारने योग्य पद्धतीने वापर केल्यास या पाण्याचा उपयोग होईल. सध्या हे पाणी वाहून नदीला मिळत असून, पाणी वाया जात आहे. याचा नागरिकांसाठी उपयोग होण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button