झुडपी जंगल जागांवरील अतिक्रमितांनाही मिळणार स्थायी पट्टे : पालकमंत्री बावनकुळे

PATTE VATAP PHOTO 11 SEPT 2019 (3)

नागपूर : राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळावा. प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासन सतत प्रयत्नरत असते. सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमितांना पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी शासनाने आदेश जारी केला. त्यानुसार प्रत्येक अतिक्रमितांना पट्ट्यांचे वाटप होत आहे. झुडपी जंगलाच्या जागेवरील अतिक्रमितांनाही पट्टे मिळावी यासाठी सरकारने न्यायालयाचे दार ठोठावले. आता तोही मार्ग मोकळा झाला असून अशा अतिक्रमितांनाही पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पश्चिम नागपूर मतदारसंघातील मरियम नगर, विकास नगर, विश्वास नगर, गोंडटोली, फुटाळा, मरारटोली येथील झोपडपट्टीवासीयांना पंजीबद्ध स्थायी पट्ट्यांचे वितरण बुधवारी (ता. ११) रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपातील सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, माजी महापौर तथा नगरसेविका माया इवनाते, नगरसेविका प्रगती पाटील, रूपा राय, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक संजय बंगाले, प्रमोद कौरती, सुनील हिरणवार, निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, शासकीय योजना ह्या लोकांसाठी असतात. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यायचा असतो. मात्र अनेकांना या योजनांची माहिती मिळत नाही. यासाठी नगरसेवक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सतत नागरिकांना त्याची माहिती करवून देतात आणि नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करतात. पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळण्यासाठी सुधाकर कोहळे आणि पश्चिम नागपूरमधील सर्व नगरसेवकांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याची फलश्रुती झाली आहे. यापुढेही नागरिकांच्या सेवेसाठी सरकार सदैव तत्पर राहील, असेही बावनकुळे म्हणाले.

यानंतर नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित परिसरातील लाभार्थ्यांना पंजीबद्ध स्थायी पट्ट्यांचे वाटप पालकमंत्री बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. संचालन नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांनी केले.