कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे-यशोमती ठाकूर

Yashomati Thakur

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जून महिन्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्यात व अमरावती शहरात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा व पुढील काळातील नियोजन ठरविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवत असताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास मुभा देण्यात आली. ३१ मे नंतरच्या काळासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्राप्त होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात व विशेषत: अमरावती शहरात स्थानिक परिस्थिती, रुग्ण व संशयितांची संख्या, सतत सुरु असलेल्या सर्वेक्षणातून पुढे येणाऱ्या बाबी आदींचा काटेकोर विचार करून नियोजन करण्यात यावे. परिसरनिहाय सूक्ष्म नियोजनातून अधिक अचूकपणे कार्यवाही व्हावी.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या, सुरक्षित परिसरात नियमांचे पालन करून दुकाने, व्यवसाय आदी सुरु होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल, असा प्रयत्नही आवश्यक आहे. मात्र, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स या बाबी पाळल्या गेल्याच पाहिजेत. त्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची प्रत्येकाने अंमलबजावणी केली तरच ते शक्य होईल. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी नियमितपणे प्रतिबंधक कारवाया करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत कशी करता येईल, याकडे लक्ष पुरवावे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रूग्णालये येथील यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेची व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जून महिन्यासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊनच विविध व्यवसायांना परवानगी आदी प्रक्रिया व्हावी. व्यवसायांना परवानगी देताना दिवस, वेळ, गर्दी टाळण्यासाठीचे उपाय आदी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. रोजगाराचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यादृष्टीने विविध उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षितताही जोपासली गेली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावती येथील ‘ब्रेनवायर आयटी’तर्फे स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन एक ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्याची माहिती संस्थेचे आकाश पालीवाल, समीर गांजरे यांनी दिली. स्क्रिनिंग व नागरिकांना मार्गदर्शन यासाठी ते उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. याबाबत तिवसा नगरपंचायत स्तरावर डेमो घेऊन व उपयुक्तता तपासून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय यावेळी झाला.

Source:- Mahasamvad News


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER