सरकारच्या दरबारात काम होत नसल्याने, लोक राज ठाकरेंच्या दरबारात : शर्मिला ठाकरे

Sharmila Thackeray - Raj Thackeray

मुंबई :- राज्यात सध्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करुणा शर्मा नावाच्या महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मुंडेंनी आपलं संबंधित महिलेसोबत लग्नबाह्य संबंध असल्याचं फेसबूकवर स्पष्ट केलं होतं. मात्र, संजय राठोड गेल्या अकरा दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. या दोन्ही प्रकरणांवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

शर्मिला ठाकरे आज वसईत माघी गणेश दर्शनासाठी आल्या होत्या. याशिवाय या ठिकाणी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी टीव्ही -९ मराठीशी बोलताना राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

यावेळी त्या म्हणाल्या ही, राज्यातील सरकार हे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना पाठिशी घालत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या या प्रकरणात अनेकांची नावे येत आहेत. मात्र तपास योग्य दिशेने होत नाही. पोलिसांनी योग्य दिशेने या सर्व प्रकरणाचा तपास करणं गरजेचं आहे”, अशी भूमिका शर्मिला ठाकरे यांनी मांडली.

‘लोकांची कामे सरकारच्या दरबारात होत नसल्याने, लोक राज ठाकरेंच्या दरबारात’

“लोकांची कामे सरकारच्या दरबारात होत नसल्याने, लोक राज ठाकरेंच्या दरबारात काम घेवून येतात. आम्ही रस्त्यावर उतरुन लोकांची कामे करतो. सरकारनेही बाहेर उतरुन जनतेची कामे केली पाहिजेत”, असा टोला शर्मिला ठाकरे यांनी यावेळी ठाकरे सरकारला लगावला.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू होणार का?

शर्मिला ठाकरे यांना यावेळी पुन्हा लॉकडाऊन लागू होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. “सरकारने दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे. नागरिकांचं आयुष्य महत्त्वाच आहे. त्याचबरोबर नागरिकांची नोकरीही महत्त्वाची आहे. याशिवाय ज्यांच्या कोरोनाकाळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे”, असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER