
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीविरोधात वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेनं सोडलेलं नाही, त्यांना धडा शिकवला आहे, असं प्रतिपादन पवार यांनी केलं आहे. देशातील एकूण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचक विधानंही केली आहेत.
शरद पवार म्हणाले, आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. यामुळे एक अजब स्थिती देशासमोर उभी राहिली. देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत श्रद्धा आहे. त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवला. इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. कारण लोकशाहीविरोधात छेडछाडी करण्याची त्यांची तयारी नव्हती.
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून समाजवादी विचारांची शक्ती समोर आली. त्यानंतर या विचारांवर चालणारे लाखो लोक पुढील अनेक वर्षात तयार झाले. देशाच्या हितासाठी त्यांनी काम केलं. दरम्यान, समाजवादी विचाराच्या कामगार संघटनाही देशभरात निर्माण झाल्या, अशा शब्दांत पवार यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला