केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा त्रास जनतेला भोगावा लागतो- सुप्रिया सुळे

supriya sule

ठाणे (प्रतिनिधी):  देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. या महागाईला केंद्र सरकारची चुकीची धोरणेच कारणीबूत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली.

ठाण्यातील माधवबागच्या नौपाडा शाखेचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्या बोलत होत्या. या प्रसंगी ॠता आव्हाड, प्रियांका सोनार आदी उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बुधवारीच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. गेली पाच-सहा वर्षे आम्ही संसदेमध्ये महागाईबद्दल बोलत आहोत. मात्र, केंद्र सरकारची धोरणेच चुकीची असल्यामुळेच देशात महागाई वाढत आहे. अन् त्याचा त्रास देशवासियांना सहन करावा लागत आहे.

काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मुखपत्राबाबत सावकरांबाबत लिहिलेल्या लेखाबद्दल माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आपणाला त्याची माहिती नाही. परंतु आमचे सरकार दडपशाहीचे नाही. या राज्यात कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे; हाच फरक मागील आणि आताच्या सरकारमध्ये फरक आहे.

मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतणीकरणाबाबत त्या म्हणाल्या की, अजितदादा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या मनात जो विचार आहे तोच बोलून दाखविला आहे. जनतेचा पैसा योग्य ठिकाणीच खर्च झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तर, भीमा कोरेगावबाबत आपणाला फारशी माहिती नाही. त्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख हेच देऊ शकतील, असे सांगत पत्रकारांचा प्रश्न टोलावला.