लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं, प्रकाश आंबेडकरांचा टोला

Prakash Ambedkar

पुणे :- कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीला दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कुठलीही ठोस योजना नाही. लोकं सांगतात आणि शासन निर्णय घेते. सरकार केवळ आदेश काढण्याचे काम करत आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारवण्याची ठोस योजना असती तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे शासन ठरवतच नाही. लोकांनी सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले. 1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील. एल्गार परिषदेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आयोजक ठरवतील. मात्र, आमचे आणि पी बी सावंत यांचे जे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाले आहे. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER