पुणेकरांनो जागे व्हा, आवाज उठवा !

Pune Municipal Corporation Editorial

Shailendra Paranjapeविनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई होणार, अशा आशयाची बातमी पुण्यातल्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसारित झालीय. त्यामध्ये पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलंय की, या संदर्भात नवे नियम ठरवण्यासाठी बैठक घेऊन आदेश काढू. बिनकामाचे रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार, तसेच एका मोटारीतून चार जण बिनकामाचे घराबाहेर पडले तरी कारवाई होणार, असंही या वृत्तात नमूद करण्यात आलंय. यापूर्वी कोरोनासंदर्भात (Corona) याच लेखमालेतल्या एका लेखातून पुणेरी शंका मांडण्यात आल्या होत्या. सध्याच्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात नव्हे तर १९९९ ते २०१४ या १५ वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अजित पवार यांनी एकदा पुण्यातल्या लोकांच्या वाचकांच्या पत्रातून टीकाटिप्पणी करण्याच्या सवयीसमोर हात टेकले होते. अगदी हात जोडून अजित पवार म्हणाले होते, “अहो, शेजारी पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही धडाधड निर्णय घेऊन अंमलबजावणी करू शकतो; पण पुण्यात कुठलाही निर्णय घेतला की, लोक इतका पत्रव्यवहार करतात आणि पेपरमधून वाचकांच्या पत्रातून आमच्यावर अशी काही टीका करतात की, पुण्यात काही करायचे तर प्रत्येकाला घरी जाऊनच विचारावं लागेल बाबा, की तुझं काय मत आहे.”

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्रकारांशी झालेल्या त्या अनौपचारिक गप्पांमधल्या वक्तव्याची आठवण या बातमीमुळं आली. पुण्यात बिनकामे फिरल्यावर कारवाई होणार पण मुळात फिरणारा बिनकामाचा फिरतोय, हे समजणार कसं…त्याला विचारण्यासाठी यंत्रणा काय असणार…अहो अगदी लॉकडाऊन (Lockdown) काळात घरातलीच औषधं पिशवीत घेऊन उत्साहाने लॉकडाऊनमुळे झालेले रिकामे रस्ते फिरून बघणारे पुणेकर काय कमी होते…समजा मी बाहेर पडलोय आणि मला पालिकेने विचारणा केली तर सांगेन की, पोटात दुखतेय आणि निघालोय डॉक्टरकडे आणि आता तुम्हीच न्या मला दवाखान्यात… मग बघा त्या पालिकेच्या प्रतिनिधीचीच पंचाईत होते की नाही ते…मी तर अभिनय करेन आणि मला टेन्शन आलेय आणि घरात गॅस संपल्याने मी बाहेर चहा प्यायला आलोय. आता पालिकावाले काय घरी येऊन गॅस तपासणार आहेत काय… आम्ही घरातले चौघेजण कोरोना निगेटिव्ह असलेले आहोत आणि आमच्या मोटारीतून घराबाहेर पडलो, घरी बसून कंटाळा येतो म्हणून तर पालिकेला काय देणंघेणं आहे.

आणि आम्ही आमच्या गाडीतून फिरलो तर कोरोना कसा पसरेल… चिंतातुर जंतूंची पुण्यात काही कमी नाही; पण त्याबरोबरच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा प्रकारचे निर्णय जर सरकार किंवा प्रशासन करणार असेल, तर त्याला सगळ्यांनीच विरोध करायला हवा. एकीकडं पालकमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच जमावबंदीचा निर्णय घेतला जाईल, असं जाहीर केलंय आणि दुसरीकडे पालिका आयुक्त मात्र नवे नियम तयार करू, असं म्हणताहेत जणू निर्णय झालाच आहे. हे अगदी जुलै महिन्यातला १० दिवसांचा लॉकडाऊन पुण्यावर लादण्यात आला तेव्हाच्यासारखं चित्रं आहे. तेव्हाही पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अजित पवार यांना बैठकीत दोन वेळा लॉकडाऊनला विरोध केल्यानं त्यांची बदली झाली असं वृत्त नंतर स्थानिक वृत्तपत्रातून प्रसारित झालं होतं.

तसाच प्रकार आत्ताही होतोय का…केवळ हेकेखोरपणामुळे पुण्यात लॉकडाऊन किंवा जमावबंदी किंवा अगदी संचारबंदीही लागू होणार का…एकीकडं लॉकडाऊन हा पर्याय नाही हे तज्ज्ञ मंडळी सांगताहेत आणि दुसरीकडे अर्थचक्राला गती द्यायला दुकानदार ग्राहकाची वाट बघत दुकानांमध्ये बसलेत. अशा वेळी लोक घराबाहेर पडलेच नाहीत तर अर्थचक्राला गती काय आयुक्त महापालिकेत बसून देणार आहेत का… कोरोना पसरतोय, त्यावर नियंत्रण मिळवण्यात येणारे अपयश हे नेमके कशामुळे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. महापालिकेकडे एकीकडे पैसे नाहीत अशा बातम्या येताहेत आणि दुसरीकडे ४० लाख पुणेकरांचा विमा काढण्याच्या कल्पना पुढे येताहेत. कोरोना काळात रिस्क पँक्टर लक्षात घेऊन विम्याचा प्रिमियम लावला जाईल आणि विमा कंपन्या काय स्वतःहून जोखीम पत्करायला पुढे येतील का? एकूणच भूक पोटाला आणि खायला देताहेत पाठीला, असला कारभार सरकार आणि प्रसासनाकडून केला जातोय, तेव्हा पुणेकरांनी जागं राहणं आणि पुणेरी शंका मांडत राहणं, इतकंच सध्या तरी हाती आहे. बाकी आले पालकमंत्र्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हे जुलैमध्ये दिसलेच आहे. आता तसं झालं तर किमान पुणेकरांनी शंका, चिंता तरी व्यक्त कराव्यातच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER