जंगल सफारीसाठी पर्यटकांची ताडोबाला पसंती

चंद्रपूर : उन्हाळा असल्यामुळे आणि बच्चे कंपनीला सुट्ट्या असल्यामुळे पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संखेत नक्कीच भर पडत असते. अशातच राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पट्टेदार वाघांचे नंदनवन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर पर्यटकांची तौबा गर्दी पाहायला मिळत असते .

वर्षागणिक पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.वाघासोबतच इतरही वन्यजीवांचे हमखास दर्शन होत असल्याने सुट्यांमधील आवडते डेस्टीनेशन म्हणून पर्यटक ताडोबाला प्राधान्य देत आहेत. उन्हाळा हा ताडोबात पर्यटनाचा सुवर्णकाळ मानला जातो. उन्हाळ्याचे चार महिने ताडोबा अभयारण्य पर्यटकांनी फुललेले असते. पानगळीमुळे वाढणारी दृश्यता आणि समतल जंगल यामुळे प्राण्यांचे हमखास दर्शन होते.

व्यवस्थापनाने ऑनलाईन बुकिंग सिस्टम सुरू केल्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम पर्यटनावर न होता उलट त्यात वाढ झालेली आकडेवारीवरून दिसून येते आहे. २०१६-१७ मध्ये येथे एक लाख ४० हजार पर्यटकांनी हजेरी लावली, तर २०१७-१८ मध्ये एक लाख ७१ हजार पर्यटक इथे आले. त्यामुळे उत्पन्नातही घसघशीत वाढ झालेली आहे. मागीलवर्षी सहा कोटी ७० हजार तर २०१७-१८ मध्ये सहा कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न ताडोबाला मिळाले आहे. ही वाढ १३ टक्के एवढी आहे.