तबलिगी मर्कझ : पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Nizamuddin Markaz Delhi

पुणे : दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील अनेकजण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . सहभागी झालेल्या ६० जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतरांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून ५० लाखांची मदत

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी मकरज हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते . या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.

यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे . पुणे शहर आणि जिल्ह्यातील काहीजण यात सहभागी झाले होते. त्यापैकी ६० जणांना जिल्हा प्रशासनाने क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. त्यापैकी कुणालाही करोनासदृश्य लक्षणं दिसून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.