‘ऑक्सिजनअभावी लोक मरताहेत !’ सर्वोच्च न्यायालयाचा संताप; हरीश साळवेंची माघार

Supreme Court - Harish Salve - Maharastra Today

नवी दिल्ली : कोरोना संकटात ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा संताप व्यक्त केला. ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत, अशी चिंता सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली. कोर्टाने आज तामिळनाडू सरकारच्या ढिम्म प्रशासनाला फटकारले.

तामिळनाडू सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे वेदांताचा ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू करता येत नाही, असे सांगितले. यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी संताप व्यक्त केला. कोरोना काळात पुरेशा ऑक्सिजनचे उत्पादन करण्याची जबाबदारी तुम्हाला पूर्ण करता येत नाही का? तुम्हाला ऑक्सिजनचे उत्पादन करणे शक्य आहे, प्लांट कोणाचा आहे हे जाणून घेण्यात आम्हाला रस नाही. ऑक्सिजनचे उत्पादन करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दुसऱ्या दिवशीही सुनावणी
आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने केंद्रालाही नोटीस बजावली. अत्यावश्यक सेवांना ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत कोणती पावले उचललीत ते आम्हाला कळवा, असे आदेश न्यायालयाने केंद्राला दिले. देशातील बहुतांश राज्यांमध्ये ऑक्सिजन, बेड आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. तसेच, कोरोना काळात अत्यावश्यक सेवांना कशा प्रकारे ऑक्सिजन पुरवठा करणार, अशी विचारणा करत केंद्राला प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २७ एप्रिलला होणार आहे.

हरीश साळवे यांची माघार
ऑक्सिजन कमतरतेच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी वरिष्ठ वकील हरीश साळवे यांना या प्रकरणात ‘न्यायालय मित्र’ म्हणून नियुक्त केले होते. मात्र, या नियुक्तीवर सोशल मीडियावरून टीका झाली. या प्रकरणातून साळवे यांनी शुक्रवारी हात काढून घेतले. “माझी सरन्यायाधीशांशी शाळेपासूनची ओळख आहे, हे जर कोण मनात ठेवत असेल, तर अशा स्थितीत मी या प्रकरणात निर्णय देऊ इच्छित नाही.” असे मत मांडत साळवे या प्रकरणातून बाहेर पडले. दरम्यान, सोशल मीडियातील टीकेवर केंद्राच्यावतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नाराजी व्यक्त केली. साळवेंच्या नियुक्तीवर आक्षेप घेताना अपशब्द वापरणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मेहता म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button