संजय राठोड यांच्या समर्थनात लोक जमले नाहीत; मोर्चा रद्द

Sanjay Rathod

यवतमाळ : पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्याप्रकरणी संशयाची सुई वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आल्यानंतर राठोड यांचे समर्थक व शिवसेना त्यांच्या बचावात उतरली आहे. या प्रकरणात राठोड यांना समर्थन देण्यासाठी राठोड यांच्या गावी पुसदला त्यांच्या समर्थकांनी आज मोर्चा आयोजित केला होता; पण मोर्च्यासाठी गर्दी जमली नाही म्हणून मोर्चा रद्द करावा लागला.

संजय राठोड (Sanjay Rathod) बंजारा समाजाचे नेते आहेत. या प्रकरणात राठोड यांची होत असलेली बदनामी म्हणजे बंजारा समाजाची बदनामी, असे म्हणून राठोड समर्थकांनी त्यांच्या समर्थनात मोर्चा आयोजित केला होता.

मोर्चेकऱ्यांमध्ये फूट

जे काही झाले त्यावर पोहरादेवी येथील बंजारा समाज समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन पुढची दिशा ठरणार असताना समाजातील वरिष्ठ नागरिकांचा सल्ला न मानता संजय राठोड समर्थकांनी आज पुसद येथे मोर्चा काढण्याचे घोषित केले, याबद्दल अनेक जण नाराज होते. मोर्चात लोक फिरकले नाहीत.

कालपासून आज दुपारी १२.४५ पर्यंत आयोजक मोठा मोर्चा असल्याचे माध्यमांना वारंवार सांगत होते. मात्र, मोर्चास्थळावर लोकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. मोर्च्यासाठी गर्दी न जमल्याने अखेर मोर्चा रद्द करण्याची नामुष्की संजय राठोड समर्थक अर्जुन राठोड आणि आयोजकांवर ओढवली. आम्ही चार जण पुसदच्या तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, असे आयोजकांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER