खिशात नाही आणा…

Pune Municipal Corporation - Editorial

Shailendra Paranjapeखिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, अशी एक म्हण आहे. नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा, अशीही एक म्हण मराठी भाषेत आहे. या दोन्ही म्हणींचे अर्थ साधारणपणे सारखोच आहेत. राजेपण नुसते नावात असून चालत नाही तर कर्तृत्वाने आणि खरोखर राजा असायला हवे, ही या म्हणीमागची अपेक्षा. थोडक्यात केवळ बडबडीने किंवा मोठं नाव ठेवल्याने व्यक्ती मोठी होत नाही तर तिचं कर्त्वही तसं मोठं असायला हवं, ही अपेक्षाही या म्हणीतून अप्रत्यक्षपणे व्यक्त होते.

करोना (Corona) रोगाने साऱ्या जगाला २०२० हे वर्ष कटू आठवणींचं म्हणून स्मरणात राहील, असं करून टाकलेलं आहे. त्यामुळे करोना विषाणूच्या जगभरच्या धुमाकुळामुळे बेदरकारपणे जगणाऱ्या अनेकांना मृत्यू नावाच्या चिरंजीव आणि शाश्वत सत्याने आणि तो केव्हाही येऊ शकतो, या वास्तवाने जागेवरही आणलेले आहे. पण हे व्यक्तिगत पातळीवर जागेवर येणं, करोनामुळे अनिश्चिततेच्या जाणिवेसह एक प्रकारची शहाणीव अंगी येणं, ही प्रक्रिया अनेक पातळींवर घडलेली आहे. आपण सारेच ती अनुभवतो आहोत.

करोनाच्या परिणामस्वरूप फार पुढचे कोणी बोलत नाही, मी असे करीन तसे करीन यापेक्षा बघू या पुढे काय होतेय ते, अशी भाषा बदललेली दिसू लागली. सर्वात पहिले प्राधान्य हे जिवंत राहण्याला आहे आणि त्यानंतर बाकीचे सारे प्राधान्यक्रम झाले. त्यामुळे आजचा दिवस आपला, द्याचा कोमी पाहिलाय, ही एक प्रकारची शहाणपणाची जाणीव जशी आली त्याच प्रकारे अनावश्यकपणे अनेक निरुपयोगी किंवा अनावश्यक वस्तूंचा संग्रह करण्याची प्रवृत्ती कमी झाली. प्राधान्यक्रम बदलले आणि वायफळ खर्च आपोआपच कमी झाले.

करोनानं आलेल्या संकटामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे आर्थिक पातळीवर समाजाच्या विविध घटकांनी हलाखीच्या स्थितीला तोंड दिले आहे. त्यातून मग लोक रोजगाराच्या नवनव्या संधी शोधत आहेत, त्यातून नवे रोजगार करताना दिसत आहेत. त्याबरोबरच छोटे छोटे व्यावसायिकही निर्माण झालेत. घरगुती स्वरूपाचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरूही झालेत. ते तसे होताना अनेकांना स्वतःमधल्या उद्योजगतेचाही नव्याने शोध लागला आहे. अर्थात, काहींनी संपूर्णपणे नव्या क्षेत्रात नोकऱ्या शोधल्या, रोजगार मिळवले आणि अंतिमतः वैयक्तिक तसेच आपापल्या कुटुंबांसाठी उत्पन्नाचे नवनवे स्त्रोत शोधले. या सर्व प्रयत्नांमागे, तडफडीमागे चिरंतन सत्यरूपाने असलेली जाणीव म्हणजे जगण्याची तीव्र इच्छा.

वैयक्तिक पातळीवर सर्वच माणसांनी हे सारं केलंय पण संस्थात्मक पातळीवर विशेषतः सरकारी यंत्रणांमधे ही शहाणीव आलीय, असं काही दिसत नाही. पुण्याची महापालिका करोनातून काही शिकलीय का, असा प्रश्न पडावा असं चित्रं आहे. स्थानिक वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांमधून पुणेकर जगभर नाव मिळवत असताना पुणे महापालिका अशी का वागते, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ताज्या बातमीनुसार महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना महापालिकेने उद्यानं रंगवण्याचा उद्योग हाती घेतल्याचे लक्षात आलंय. वास्तविक, करोनामुळे पालिकेची हातातोंडाशीही गाठ नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च कमी करावेत आणि केवळ अत्यावश्यक अशा गो,टींसाठीच तरतूद करावी, अशा सूचना राज्याच्या मंत्रिमंडशाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. पण पुणे महापालिकेतल्या विद्वानांना मात्र हे काही पचनी पडलेले दिसत नाही. अन्यथा, उद्यानं रंगवण्याचा आणि जेवायला अन्न नसताना तोंडाच्या रंगरंगोटीवर खर्च करण्याचा शहराचा नावलौकिक लयाला नेण्याचा प्रकार या लोकांनी केलाच नसता.

उद्यानं रंगवण्याच्या प्रकारामुळेच खिशात नाही आणा आणि नाव सोनुबाई या म्हणींची आठवण होतेय. शहराचा इतिहास किंवा लौकिक कितीही मोठा असो, तो मिळवायला खस्ता खाव्या लागतात पण घालवायला एखादे पाऊलही पुरेसे असते. पुण्याच्या नगरपित्यांना ही जाणीव नाही आणि ती नसणं ही गोष्ट करोनापेक्षाही भयंकर रोगासारखीच आहे. नगरपित्यांना रोगमुक्त व्हायच्या शुभेच्छा देण्यापलीकडे आपण तरी काय करू शकतो. त्या देऊ यात. शुभेच्छांचाही उपयोग नाही झाला तर आहेच २०२२.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER