पेढा की बर्फी?

Dhanashree Kandgaonkar

जगात अनेक गोष्टी आपल्या चेहऱ्यावर आनंद देणाऱ्या असतात. आई होणं हे त्यापैकीच एक. मग ती अगदी कुणीही असो. सध्या अशाच आनंदाचे तेज चेहऱ्यावर आलेली अभिनेत्री धनश्री कांडगावकर (Dhanashree Kandgaonkar) तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून दिलखुलास भेटतेय. धनश्री आई होणार आहे हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला. ओटी भरणाच्या लूकमध्ये धनश्री कमालीची सुंदर दिसत होती. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात पेढा की बर्फी (Pedha or Barfi) असं अनेकांनी तिला विचारल्यावर तिने ‘बर्फी’ असं उत्तर दिलं.

पेढा असो किंवा बर्फी, मी आई होणार हेच माझ्यासाठी खूप आनंददायी, असं म्हणत ओटी भरणाचा सोहळा धनश्रीने चांगलाच एन्जॉय केला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनीसाहेब या मालिकेतून लोकप्रियता मिळालेली धनश्री या मालिकेतून बाहेर पडली तरी तिला तिचे चाहते विसरले नव्हते. दुर्वेश देशमुख यांच्यासोबत धनश्रीने लग्न केले आणि पडद्यावरची ही वहिनीसाहेब खऱ्या आयुष्यातही कुणाची तरी वहिनी झाली. लॉकडाऊन काळात धनश्रीने घरात करणाऱ्या नवनव्या पदार्थांच्या रेसिपी पोस्ट करत चाहत्यांशी संवाद सुरू ठेवला होता.

धनश्रीने घरातच पाणीपुरीचा स्टॉल लावून एक वेगळा प्रयोग केला होता. तिच्या लॉकडाऊन रेसिपीची चर्चा ऑनलाईन माध्यमात चांगलीच रंगली होती. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून धनश्रीने टीव्ही जगतात पदार्पण केले. त्यानंतर काही शोमधूनही ती दिसली. सध्या मात्र छोट्या पडद्यापासून विश्रांती घेत गेल्या आठ महिन्यांपासून ती डोहाळे पुरवून घेत होती. निळ्या रंगाच्या आणि गुलाबी काठाच्या साडीवर फुलांचे दागिने घालून धनश्रीने ओटी भरणाचे खूप सारे फोटो शेअर केले आहेत. धनश्रीच्या या लूकमध्ये लक्ष वेधून घेतले ते तिच्या ब्लाऊजवरच्या श्रीकृष्णाच्या फोटोने.

हा नवा ट्रेंड सध्या फॅशनमध्ये जोरात सुरू आहे. धनश्री वहिनीसाहेब म्हणून ऑनस्क्रीन साडीत दिसत असली तरी ती प्रत्यक्षात फॅशन आणि स्टाइलभोक्ती आहे. सध्या तिच्यावर प्रेगन्सीचं बाळसं आलं आहे; पण ती सांगते, बाळाची चाहूल हा विषयच इतका महत्त्वाचा आहे की या काळात वाढत्या वजनाची काळजी करायची नाही. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता हे पात्र पुन्हा आलं आहे.

जेव्हा ही बातमी आली तेव्हा धनश्रीच मालिकेत पुन्हा येणार का, अशी चर्चा होती. तिच्या चाहत्यांनाही तिला पडद्यावर अभिनय करताना बघायचे आहे. पण कितीही मनात असलं तरी धनश्री सध्या मालिकेत काम करू शकणार नव्हतीच. त्यामुळे या मालिकेत माधुरी पवार हिची वर्णी लागली. माधुरीला धनश्रीने आवर्जून शुभेच्छा तर दिल्याच; पण नंदिता गायकवाड हे पात्र रेखाटण्यासाठी तिला काही टिप्सही दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER