पेडर रोड येथे दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Accident

मुंबई : भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीच्या धडकेमध्ये 47 वर्षीय पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री पेडर रोड परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन गावदेवी पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वाराला बेड्या ठोकल्या आहेत.

ग्रॅन्ट रोड येथील बदवार चाळीमध्ये राहात असलेले राममिलन निर्मल हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पेडर रोड परिसरातून चालत जात होते. याच मार्गावरुन भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमी अवस्थेतील निर्मल यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी निर्मल यांना उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले. घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या गावदेवी पोलिसांनी राजधर यादव यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.