केरळमध्ये शरद पवारांचा काँग्रेसला धक्का, वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्यात यशस्वी

नवी दिल्ली :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसची होत असलेली वाताहत बघून शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पवारांनी आता काँग्रेसच्या (Congress) नाराज असलेल्या नेत्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. काल पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का देत एका नाराज असलेल्या वरिष्ठ नेत्याला आपल्या पक्षात आणून त्याची सुरुवातही केली आहे. केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पी सी चाको (PC CHOKO) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या उपस्थितीत चाको यांनी घड्याळ हाती बांधलं. पी सी चाको हे काँग्रेसकडून तब्बल सातवेळा खासदार होते. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) उपस्थित होते.

या पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणावर चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी वाझे प्रकरण हा स्थानिक मुद्दा असल्याचं सांगून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पवारांना मात्र याच मुद्द्यावर थेट भाष्य करावं लागलं. वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारवर काही परिणाम होणार आहे का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी एका इन्स्पेक्टरमुळे सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. वाझे प्रकरणाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असं पवार म्हणाले.

यावेळी सचिन वाझेंची शिवसेनेकडून करण्यात येत असलेली पाठराखण आणि हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आलेलं अपयश यामुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वजण काम करत आहेत. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो, असं पवार म्हणाले.

अँटालिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणं आमचं काम आहे. त्यांच्या कामात अडचण येऊ नये यावर आमचा भर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत क्लीनचिट दिली. या प्रकरणात गृहमंत्र्याने उत्तम काम केलं आहे. चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण योग्य रीतीने हाताळलं आहे. तसेच पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्या उचलबांगडी विषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला. सिंग यांना ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेतील. तो त्यांचा अधिकारातील विषय आहे. कुणाला ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं, कोणत्या अधिकाऱ्यांकडे काय जबाबदारी द्यायची हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा करता, तुमचा सल्ला घेतला जातो, असं पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा, मी फक्त विकासाच्या धोरणात्मक विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. कोणत्या अधिकाऱ्याला ठेवायचं, कुणाला हटवायचं या गोष्टीत मी लक्ष घालत नाही. मला त्यात रस नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; मधुकर पिचडांना मोठा धक्का देत खंदे समर्थक राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER