मी मेल्यावर माझ्या तक्रारीची चौकशी करणार का पायल घोषचा सवाल

Payal Ghosh

बॉलिवुडमध्ये मी टू प्रकरणाने डोके वर काढल्यानंतर अभिनेत्री पायल घोषने प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपवर मी टूचा आरोप केला होता. तिने याबाबत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. पायलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठीही बोलावले होते. परंतु त्या चौकशीचे पुढे काहीही न झाल्याने पायल घोष आता संतापली आहे. मी मेल्यावर माझ्या तक्रारीची चौकशी करणार का असा सवाल तिने पोलिसांना केला आहे.

पायल घोषने अनुराग कश्यपवर आरोप केल्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तिला संपूर्ण पाठिंबा दिला होता. पक्षाने पाठिंबा दिल्याने पायलने रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ऑक्टोबरमध्ये रिपाईंत प्रवेश केला. पायलने तेव्हा सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले होते. याच पायलने आता अनुरागच्या चौकशीच्या मुद्द्यावरून ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे पायलने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटरवर एक ट्विट केले असून त्यात मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. ट्विटमध्ये पायलने म्हटले आहे, ‘अनुराग कश्यप विरोधात मी तक्रार देऊन आणि सर्व पुरावे देऊन चार महिने झाले आहेत. परंतु पोलिसांनी अनुराग कश्यपविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. ही कारवाई पुढे सरकावी म्हणून मला कदाचित मरावे लागेल. त्यानंतरच पोलीस कारवाई करतील’ असा उद्वेगही तिने ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

पायलने आणखी एक ट्विट केले असून त्यात तिने म्हटले आहे, ‘मी तक्रार करून इतके दिवस झाले पण मुंबई पोलिसांनी आपले काम केलेले नाही. हा एका महिलेचा प्रश्न असून आपण समाजासमोर कोणते उदाहरण सादर करतोय याबाबत जागरुक होणे गरजेचे आहे.’ असेही पायलने ट्विटमध्ये म्हटले आहे.