दुर्गम भागातील लसीकरणासाठी विशेष लक्ष घाला; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

CM Uddhav Thackeray

नंदूरबार : राज्यात कोरोनाचा (Corona) वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंदूरबारचा दौरा केला. यावेळी धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर विशेष लक्ष घालण्याची सूचना केली. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी (Coronavirus Vaccination) आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन करावे, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात; परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष लक्ष घालण्यात यावे. कोरोना विषाणूचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात यावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व ती मदत करेल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटनमंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पालकमंत्री पाडवी म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास २०० डोंगर हिरवे होतील. त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यात मनरेगाच्या माध्यमातून या वर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER