महापालिकेच्या विविध प्रश्नात लक्ष घाला क्षीरसागरांची ना. शिंदे यांना विनंती

Rajesh Kshirsagar - Eknath Shinde

कोल्हापूर : रखडलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, घरगुती गॅस पुरवठा पाईपलाईन, तसेच महापालिकेत गाजत असलेल्या घरफाळा भ्रष्टाचार प्रकरणी मंत्रालयात बैठक घ्या, प्रलंबित योजनांना गती देण्यासह भ्रष्टाचारातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

शहराला काळम्मावाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजनेस सन २०१३ मध्ये शासनाने मंजुरी दिली. या योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरवात झाल्यानंतर ही योजना अनेक विभागांच्या परवानगीमुळे रखडली. योजनेत भ्रष्टाचार झाल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे ही योजना तातडीने पूर्ण होवून शहरवासीयांच्या पिण्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

गॅस अथॉरिटी ऑफ इंडियामार्फत (गेल) शहरास पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याच्या योजनेला २००९ मध्ये मंजुरी मिळूनही कामास सुरुवात झालेली नाही. रस्ते खोदकाम आणि दुरुस्तीचे ६६ कोटी रुपये शुल्क कंपनीला अमान्य असल्याने अडथळा निर्माण झाला आहे. तसेच महापालिकेची आर्थिकस्थिती नाजूक आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, विकासकमांना पैसे नाहीत. घरफाळा हाच उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. याविभागातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आर्थिक घोटाळा केल्याची प्रकरणे उघड होत आहेत. २००१ ते २०२० अखेर सर्व घरफाळा घोटाळा प्रक्रियांची व कार्यवाहीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करुन श्वेतपत्रिका जाहीर करा, अशी मागणी निवेदनाव्दारे क्षीरसागर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER