‘१०० बिटकॉइन द्या, अन्यथा उडवून देऊ’; मुंबईतील चार पंचतारांकित हॉटेल्सना धमकीचे ई-मेल

4 high-end Mumbai hotels get LeT threat mail

मुंबई : मुंबईतील चार पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाला बुधवारी हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल ‘लश्कर-ए-तोयबा’ (आयएसआय) या दहशतवादी संघटनेच्या नावाने प्राप्त झाला होता. हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर बुधवारी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. धमकी देणाऱ्याने आपण लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा केला होता. या धमकीच्या ई-मेलनंतर हॉटेलमध्ये कसून तपासणी केली गेली.

अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. तथापि, तपासणी दरम्यान संशयास्पद काहीही सापडले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हॉटेल उडवण्याची योजना अयशस्वी झाल्यास, “कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील मुलांना पळवून ठार मारण्याची धमकी” या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल आल्याबद्दल पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या हॉटेल्समध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) हॉटेल्सची कसून तपासणी केली; पण त्यात संशयास्पद काहीही सापडले नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त (ऑपरेशन) प्रणय अशोक यांनी दिली.