पवारांचं काम मोठं, यासाठीच मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिलं- संजय राऊत

Sharad Pawar & Sanjay Raut

मुंबई :- भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला मजबूत करण्यासाठी आघाडीचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) करावं असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेकदा केलं. यावरून राऊत यांनी उगाच सल्ले देऊ नये. राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) विचारला होता. पटोलेंच्या या प्रश्नाला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

कोणाला मी शरद पवारांचा प्रवक्ता वाटत असेल तर त्याचा मला आनंदच आहे. पवार यांच्या विधानांचं समर्थन करणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. शरद पवारांचं काम अतिशय मोठं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिलं आहे. मी शरद पवारांचा असण्याचा-नसण्याचा प्रश्न नाही. मी अनेकदा सोनिया गांधी, राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेच्या विरोधातही बोललो आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला विरोधकांना जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रवक्ता होतो का? सोनिया, राहुल यांच्यावर टीका होत असताना ही सगळी मंडळी कुठे होती? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पप्पू म्हटलं जातं. त्यांची टिंगल केली गेली. सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना विरोधकांनी मर्यादा ओलांडली. तेव्हा मी त्यांच्यासाठी पहाडासारखा उभा होतो. ही गोष्ट काँग्रेस नेते नाना पटोले बहुतेक विसरले असतील. पण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना त्याची कल्पना आहे, असं राऊत म्हणाले. यूपीए मजबूत करणं देशाची गरज आहे. ती कोण करतंय याला महत्त्व नाही. पण ती भक्कमपणे उभी राहायला हवी, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंची खेळी, संजय राऊतांवर वचक ठेवण्यासाठी सावंत यांनाही मुख्य प्रवक्तेपद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button