पवारांचा यूटर्न नाही, त्यांची भूमिका योग्यच ; संजय राऊतांकडून पवारांची पाठराखण

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Modi

नवी दिल्ली :- कृषी कायदे (Agriculture Law)रद्द करण्याचा मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज राज्यसभेत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. एकेकाळी या कायद्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी अचानक यूटर्न घेतल्याचा आरोप मोदी यांनी लगावला. त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत पवारांची पाठराखण केली.

शरद पवारांनी यूटर्न घेतलेला नाही. त्यांची भूमिका योग्यच आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून पंतप्रधानांनीच एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. शेतकरी अज्ञानी आहे. त्याच्या मनात भीती आहे. शेती, पीक हेच त्याचं सर्वस्व आहे. त्यामुळे पंतप्रधांनी केवळ आवाहन करू नये. एक पाऊल पुढे यावं. शेतकऱ्यांशी चर्चा करावी. त्याने पंतप्रधानांची ऊंची कमी होणार नाही, उलट त्यांची ऊंची वाढेल, असं त्यांनी सांगितलं.

पुढे राऊत म्हणाले की, देशात आंदोलकांची एक टोळी सक्रीय झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आंदोलक आणि आंदोलनावर टीका करून पंतप्रधान आंदोलकांचं खच्चीकरण करत आहेत. हे देशाच्या परंपरेला शोभणारं नाही, असं सांगतानाच रामजन्मभूमी, रथयात्रा हे आंदोलन नव्हतं का? असा सवाल करत आंदोलने होतच असतात. त्याचं खच्चीकरण करणं देशाच्या परंपरेला शोभणारं नाही. भाजपही आंदोलन करूनच पुढे आला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करूनच भाजप पुढे आला आहे. भाजपच्या सायबर फौजांनी बदनामी आंदोलन उभारंल, त्यामुळे भाजपला चांगले दिवस आले, असं सांगतानाच राम जन्मभूमी आंदोलन, रथयात्रा, भारत जोडो, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम हे आंदोलन नव्हते काय? असा सवाल करतानाच तुम्हीच केलेल्या राष्ट्रीय आंदोलनाची तुम्हीच तुमच्या वक्तव्यातून बदनामी केली आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.

गृहमंत्री अमित शहा यांनी काल सिंधुदुर्गात येऊन बंद दाराआड शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं होतं. डंके की चोटपर सांगतोय, असंही शहा म्हणाले होते. त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. शहा डंके की चोटपर बोलत आहेत. बोलू द्या, शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी डंके की चोटवरच बोललं पाहिजे, पण हा डंका कुणासाठी पिटला जातोय? कुणाच्या व्यासपिठावरून पिटला जातोय… बरं… एवढं करून काय झालं?… आमचं काय वाकडं झालं?… धुरळा उडाला आणि बसला, अशी खोचक टीका त्यांनी केली. राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही. शहांनी नवा प्रयोग करावा. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून कारवाई करावी. आम्हाला तुरुंगात टाकावं, आम्ही त्यांचे शत्रू आहोत ना? पण आमचा बालही बाका होणार नाही, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : आधी पाठिंबा दिला, मग यू-टर्न का? कृषी कायद्यांवरून पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER