नाथाभाऊंवर मोठी जबादारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी पवारांचे संकेत

Eknath Khadse-Sharad Pawar

मुंबई: भाजपला (BJP) रामराम ठोकून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडे कृषी किंवा गृहनिर्माण मंत्रिपद जाण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाही. आहे त्यात काहीच बदल होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र याचवेळी नाथाभाऊ हे जयंत पाटलांच्यासाथीने (Jayant Patil) पक्ष वाढवण्याचं काम करतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पवारांनी हे संकेत दिले. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्याशीही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एका शब्दांनीही माझ्याकडे कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही. ४० वर्षे भाजपमध्ये काम केलं.

आता दुर्देवानं हा निर्णय घ्यावा लागतोय. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पडेल ते काम करण्याची माझी इच्छा आहे, असं सांगतानाच जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम चांगलं सुरू आहे. आता त्यांना नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ मिळेल. संघटना आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाची जयंतरावांना साथ मिळणार आहे. असे संकेत पवारांनी दिले. त्यामुळे येत्या काही दिवसात एकनाथ खडसेंना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी पण वाचा : अजित दादा नाराज नाहीत, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची करवून दिली भेट 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER