पवारांचा फोन, शब्दाचा मान राखत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय

Sharad Pawar - Pratap Mane

कोल्हापूर :- राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यातच यंदा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपा (BJP) यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) अरूण लाड (Arun Lad) यांना अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भय्या उर्फ प्रताप माने यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने त्याचा फटका लाड यांना बसण्याची शक्यता होती. परंतु पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मला फोन आला. त्यांनी माघार घ्या अशी सूचना केली. त्यांच्या शब्दाला मान देऊन पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी मागे घेणार आहे. असे स्पष्टीकरण भय्या उर्फ प्रताप माने यांनी पत्रकार परिषदेत दिले. पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अरुण लाड यांची निवड केली. दोन दिवसापूर्वी लाड यांनी माने यांची भेट घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. अशी विनंती केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मग निर्णय घेऊ. असे माने यांनी सांगितले. त्याप्रमाणे आज जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माने यांनी उमेदवारी मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पवार खान्देशात पक्ष विस्तार मोहिमेवर

यावेळी माने म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला मोठे केले. प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून मी कार्य बघितले. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहे. गेल्या सहा विधानसभा निवडणुकीमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठेने काम करून पक्षाला विजयी केले. मला पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र पक्षाने अरुण लाड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पवार साहेबांचा मला फोन आला. तुम्ही उमेदवारी मागे घ्या अशी सूचना त्यांनी केली. राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचाही ह्याबाबत फोन आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ही माघार घ्या असे सांगितले.

शरद पवार व हसन मुश्रीफ यांचा शब्द मी कधीच डावलू शकत नाही. त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण ताकतीने अरुण लाड यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे माने यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, नावेद मुश्रीफ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेश लाटकर, आदिल फरास, अनिल साळोखे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER