मराठ्यांनी काय करावे हे पवारांच्या कुत्र्याने सांगू नये; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

मुंबई :- ‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ या पुस्तकावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालेलं असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपती गादीच्या वारसदारांनीही बोलले पाहिजे, असे म्हटले होते. आता या वादात नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. मराठ्यांनी काय करावे हे पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, अशा शब्दांत निलेश राणेंनी राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे, सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी तीव्र शब्दांत  आक्षेप नोंदवला आहे. जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकाला सध्या सर्व स्तरांतून विरोध होतो आहे. राज्यात सत्तेत मोठा भाऊ बनलेल्या शिवसेनेनेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपामधून राजीनामे द्यावे, अशी मागणी राऊतांनी पत्रकार परिषदेत केली.

ज्यावेळी मराठ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यावेळी राऊतांनी आगीत तेल ओतायचे काम केले आहे. त्यांना मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत, अशा शब्दांत निलेश राणेंनी राऊतांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. त्यामुळे शिवसेनेकडून राऊतांच्या या टीकेला काय उत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.