पक्षासाठी पवारांची नवी खेळी; विधानपरिषदेसाठी विदर्भातील या दोघांना उमेदवारी देण्याची शक्यता

Sharad Pawar

मुंबई :- प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देणारे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर दोघांनीही प्रवेश घेतला.

कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असताना घाईगडबडीत झालेला हा पक्षप्रवेश राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विदर्भात पक्षाला बळकटी मिळावी यासाठी पवारांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेसाठी योग्य उमेदवार देण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मोठे नेते हरिदास भदे, बळीराम सिरस्कार हे गेल्या काही दिवसांपर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. भदे हे धनगर समाजाचे तर सिरस्कार हे माळी समाजाचे नेतृत्व करतात. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिपमधून भदे व सिरस्कार यांना आमदारकीची संधी मिळाली. २०१९ च्या विधानसभा आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढले. त्यांनी भदेंना अकोला पूर्वमधून तिकीट दिले; मात्र ते पराभूत झाले. सिरस्कारांना बाळापूरमधून तिकीट नाकारण्यात आले होते.  त्यानंतर दोन्हीही नेते नाराज होते. यानंतर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात होता. फेबु्वारीत या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क झाला. त्यानंतर काही दिवसांतच दोघांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी पक्षप्रवेश झाल्यासंबंधीचे ट्विट  स्वत: शरद पवार यांनी केले होते. धनगर आरक्षणासंबंधी चर्चा झाल्याचे त्यात त्यांनी म्हटले होते. मात्र भदे यांनी त्यावर घूमजाव केले होते. धनगर समाजाच्या मागण्या मान्य केल्या तरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे भदे यांनी जाहीर केले होते. या दरम्यान अकोल्यात मोठा कार्यक्रम घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन होते; मात्र कोरोनाचे संकट असल्याने भदे व सिरस्कारांचा राष्ट्रवादी प्रवेश आज नव्याने घडवून आणण्यात आला आहे. शरद पवार यांनी आज यासंबंधाने ट्विट केले आहे.

पवार यांनी विदर्भात वंचित बहुजन आघाडीला कमकुवत करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. वंचितचे प्रवाभक्षेत्र असलेल्या अकोल्यात ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांसोबत आहे. त्यामुळे भदे हे धनगर तर सिरस्कार हे माळी नेते पवारांनी सोबत घेतले आहेत. मात्र लॉकडाऊन सुरू असताना प्रवेशासाठी एवढी घाई का केली गेली, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. पुढील आठवड्यात राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यासंदर्भाने हा प्रवेश झाल्याचे मानले जात आहेत. १२ पैकी राष्ट्रवादीला ४ जागा येऊ शकतात. त्यात राष्ट्रवादी ओबीसींना मोठी संधी देऊ शकते. त्या दृष्टीने भदे व सिरस्कारांकडे पाहिले जात आहे. या दोघांना राष्ट्रवादीने आमदार केले तर वंचितच्या प्रभावक्षेत्रात आणि विदर्भात राष्ट्रवादीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय राज्यभरात धनगर, माळी समाजाची व्होट बँक भक्कम करणे राष्ट्रवादीला शक्य होणार आहे. यासाठीच पवारांनी त्यांना सोबत घेतल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER