पवारांची नाराजी भोवली; अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी

Sharad Pawar - Parambir Singh - Maharashtra Today

मुंबई :- सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. तसेच या प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना पदावरून हटवण्याची मागणीही त्यांनी केल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे अखेर आज पवारांची नाराजी परमबीर सिंह यांना भोवली आहे. त्यांची या पदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या एनआयएच्या (NIA) अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या स्फोटकेप्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. मागच्या आठवड्यात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून परमबीर सिंह यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंह यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना पदावरून हटवण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्युप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांची पाठराखण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं सांगितलं जातं.

ही बातमी पण वाचा : वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER