पवारांची कन्या वाचली, मग काँग्रेस का बुडाली?

Badgeनरेंद्र मोदींच्या त्सुनामीत सारेच उडून गेले. राष्ट्रवादीचे किडूकमिडूक बचावले. काँग्रेसचा तर पार सुपडासाफ झाला. बारामती जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखा रांगडा मंत्री बसवला असताना सुप्रिया सुळे जिंकतात; पण तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडचा आपला गड गमावतात. याचा मेळ कसा बसवायचा ? राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्या गेल्याने काँग्रेसवर ही पाळी आली का? कारण मागच्या निवडणुकीत मोदीलाटेत अशोकराव बचावले होते. मग यावेळी असे काय घडले की महाराष्ट्र ‘काँग्रेसमुक्त’ झाला? ह्या पडझडीमध्ये शरद पवारांचा हात किती? चिंतन बैठकीचा ठेका संघवाल्यांनीच घेतला असे थोडीच आहे? मागच्या निवडणुकीत कोल्हापूर, सातारा, बारामती आणि माढा अशा चार जागा राष्ट्रवादीच्या आल्या तर काँग्रेसच्या दोन आल्या. ह्याही वेळी राष्ट्रवादीचा स्कोअर ‘दुष्काळी’ आहे.

हि बातमी पण वाचा : पवारांनी आता राष्ट्रवादी गुंडाळावी

राष्ट्रवादीची आता तेवढीच ताकद उरली आहे; पण मावळमध्ये अजितदादांचा मुलगा पार्थ याचे पडणे धक्कादायक आहे. पवार घराण्यात प्रथमच कुणी पराभवाचे तोंड पाहिले. शरद पवारांचा नातू पडू शकतो? शरद पवारांच्या परवानगीशिवाय? हे कुठले राजकारण आहे? पार्थने तेथून लढू नये असे शरदरावांना सुरुवातीला वाटत होते. त्यातून कुटुंबातला संघर्ष बाहेर आला असे म्हणतात. धूर असेल तर विधानसभा निवडणुकीत भडका उडू शकतो; कारण अजितदादांचे टार्गेट यावेळी सीएम व्हायचे आहे; पण सोपे नाही. कारण शत्रू वाढले आहेत. विजयसिंहदादा मोजून हिशेब चुकता करणार. राधाकृष्ण विखे पाटील छातीला माती लावून तयार आहेत. त्यांच्या मुलाला जागा बदलून देऊ शकत नाही? शरदराव केव्हापासून एवढे तत्त्वाचे निघाले? नगरची जागा काँग्रेसला दिली असती तर आजचे पानिपत टळले असते अशातला विषय नाही; पण काँग्रेसचे एवढे धिंडवडे निघाले नसते. विधानसभेतील विरोधी नेताच निघून गेल्याने काँग्रेसला सेनापतीच नव्हता. सैन्य सैरभैर लढत होते. आघाडीतील मित्रपक्ष म्हणून लक्ष घालावे असे शरदरावांना का वाटले नाही? आघाडी म्हणता तर काय समन्वय होता? की साहेबांचा जीव एकट्या बारामतीत अडकला होता? अशोक चव्हाण यांची यावेळी लढायची इच्छा नव्हती. त्यांना विधानसभेत यायचे होते. ‘आदर्श’मुळे अर्धवट सोडावा लागलेला सीएमपदाचा डाव पुन्हा मांडायचा होता; पण राहुलबाबाने त्यांना बळजबरीने लंगोट कसायला भाग पाडले. सक्षम उमेदवार दिले असते तर ह्या त्सुनामीतही काँग्रेस टिकली असती. चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी दिलेल्या कडव्या झुंजीतून हे स्पष्ट होते;

ही बातमी पण वाचा : राज्यात भूईसपाट काॅंग्रेसचा एकमेव तारणहार ठरला, माजी शिवसैनिक “बाळू धानोरकर”

पण खरेच काँग्रेसने जिंकावे अशी कुणाची इच्छा होती? प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला असे विश्लेषण केले जाते; पण प्रत्येक निवडणुकीत मतं खाण्यासाठी अशा ‘आघाड्या’ उभ्या होत आल्या आहेत. हे नवे नाही. लोकसभेत कमी धिंगाणा होता. विधानसभेत वंचित आघाडी काँग्रेसवाल्यांना पार ‘वंचित’ करून ठेवणार आहे. ‘ऑर्डर नाही’ म्हणून पृथ्वीराजबाबा, बाळासाहेब थोरात दुरून गंमत पाहात आहेत. ‘आज कुठली भाजी करायची’ हेदेखील राहुल गांधींना विचारून ठरवायचे असेल तर निकाल ठरला आहे. एखादे ‘वायनाड’ पकडून राहुलबाबा वाचेल; पण इतरांना समाधी ठरली आहे. लोकसभेचे महाराष्ट्रातले निकाल आभाळातून पडले नाहीत. त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमची कठोर मेहनत आहे. ‘बेट’ लावून लढायची चंद्रकांतदादाची स्टाईल जोरदार आहे.

‘निवडणुका जिंकवून देणारा मुख्यमंत्री’ म्हणून फडणवीस यांनी स्वतःची इमेज बनवली आहे. आजच्या यशाने त्यांचे वजन दिल्लीत आणखी वाढणार आहे. सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूकही आता मुख्यमंत्र्यांना सोपी झाली आहे. पुढचे मुख्यमंत्रीही तेच असतील.

ही बातमी पण वाचा : पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात डॉ. पायलला आत्महत्या करावी लागली हे धक्कादायक – सुप्रिया सुळे