पवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ?

Sharad Pawar-Kalyanrao Kale

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला तरी पडद्या आड काही राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान आमदार भारत भालकेंच्या निवासस्थानी पवारांच्या भेटीसाठी थांबलेल्या काळेंना प्रवेश नाकारल्याने काळे समर्थक अधिकच अस्वस्थ झाले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती बघता काळेंना भेटीपासून रोखणे हा पवारांचा सावध पवित्रा असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने दिले आहे.

माजी आमदार सुधाकर परिचारक (Sudhakar Paricharak), जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिध्द किर्तनकार रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर पवार मंगळवारी त्यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीसाठी आले होते. मंगळवारी (ता. २९) दुपारी भोसे येथे (कै) राजूबापू पाटील यांचे चिरंजीव गणेश पाटील व त्यांच्या कुटुंबियाची पवारांनी भेट घेतली. यावेळी कल्याणराव काळेंसह(Kalyanrao Kale) आमदार भारत भालकेंची अवर्जून उपस्थिती होती. त्यानंतर शरद पवार थेट संत कैकाडी महाराज मठामध्ये दाखल झाले. तेथे रामदास महाराजांच्या कुटुंबियाची भेट घेतली. तेथेही कल्याणराव काळे अवर्जून उपस्थित होते. तेथून पवारांचा ताफा परिचारकांच्या वाड्यात गेला. तेथे श्री. पवार यांनी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व त्यांच्या कुटुंबियांची भेट ;घेतली. यावेळी काऴेंसह अनेक नेते उपस्थित होते. गाठीभेटी झाल्यानंतर पवार आमदार भारत भालकेंच्या सांगोला रोडवरील निवासस्थांनी विश्रांतीसाठी थांबले होते. तेथे त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर पवार यांनी काही मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच दरम्यान काळे हे देखील आमदार भालकेंच्या निवासस्थांनी पवारांची भेट घेण्यासाठी पोचले.

आतमधून कुठलीही सूचना आल्याशिवाय कोणालाही आता मध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आपल्याला आतमध्ये बोलावून घेतील या अपेक्षेने काळे बराच वेळ गेटवर इतर कार्यकर्त्यांसारखे थांबले होते. त्यांना आतमध्ये घ्या असा निरोप उपस्थित कार्यकर्त्याकरवी पवारांपर्यंत पोचवण्यात आला. तरीही त्यांना आतमध्ये सोडण्यात आले नाही. शेवटी वाट पाहून काळे यांनी तेथून काढता पाय घेतला.

काळे हे नाराज होवून निघून गेल्याचे कळताच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला. दरम्यान ते घरी पोचले होते. शेवटी मग त्यांनी जाताजाता हेलिपॅडवर जावून पवारांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही. दिवसभर पवारांच्या ताफ्यासोबत फिरुनही कल्याणराव काळे यांना पवारांनी भेटीसाठी बोलावले नसल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER