पवारांची राष्ट्रीय राजकारणात मोठी खेळी; काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी होण्याची शक्यता

Sharad Pawar Maharastra Today

नवी दिल्ली :- पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे संकेत कालच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिले आहे. पवारांनी अल्टरनेटिव्ह प्रोग्रेसिव्ह मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे या आघाडीत शरद पवार काँग्रेसला सोबत घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एकाकी पडणार की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हणत तसे संकेतही देऊन टाकले. तिसऱ्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीला आकार दिला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्वाकडून सतत हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे अशा वेळी लोकशाहीवादी पक्षांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा दिला पाहिजे. येचुरी यांचा फोन आला होता. अल्टरनेटिव्ह मंच निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत विचार करा. आपण किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यात काहीच अंतर्विरोध नाही, असं येचुरी यांनी म्हटल्याचं पवारांनी सांगितलं होतं. अनेक नेत्यांनी पर्यायी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असं पवारांनी काल म्हटलं होतं.

दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष अनुकूल नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे.

मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनिमित्त अनेक राजकीय पक्ष रणांगणात उतरले आहेत. सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. या नेत्यांनी केवळ ममतादीदींना पाठिंबा दिला नाही तर त्यांनी ममतादीदींसाठी प्रचार करण्याची तयारीही दाखवली आहे. पवारांच्या प्रयत्नामुळेच विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक प्रचारासाठी व्यापक रणनीती तयार केल्याचं बोललं जात आहे.

२०१४ पासूनच विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गैरभाजपा आणि गैरकाँग्रेसी पक्षांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. अनेक प्रादेशिक पक्षांना नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे नको आहे. कारण अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा थेट काँग्रेसशी सामना आहे. त्यामुळे नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेस वगळता इतर पक्षाकडं असावं असं या पक्षांचं मत आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये लढत आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि सपा आमनेसामने आहेत. त्यामुळे काँग्रेसला वगळून नवी आघाडी बनवावी असंही या पक्षांमध्ये घटत असून असं काही झाल्यास विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पवारांचे अनेक राजकीय पक्षांशी मधुर संबंध आहेत. टीआरएस, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांसोबत पवारांचे चांगले संबंध आहेत. मात्र, असं असलं तरी हे पक्ष काँग्रेससोबत यायला तयार नाहीत. त्यामुळे या पक्षांनी भाजपशी चांगले संबंध ठेवले आहेत. उद्या आघाडीचं नेतृत्व पवारांकडे आल्यास हे पक्ष पवारांसोबत येऊ शकतात. तर जेएमएम, आरजेडी, सपा आणि डावे पक्षही पवारांसोबत उभे राहू शकतात. त्यामुळे काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसू शकतो. अशात काँग्रेस विरोधी पक्षातच एकाकी पडू शकते, असंही राजकीय विश्लेषकांचं निरीक्षण आहे.

ही बातमी पण वाचा : केरळमध्ये शरद पवारांचा काँग्रेसला धक्का, वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्यात यशस्वी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER