पवारांची मोठी खेळी; संदीप क्षीरसागरांना केले लिफ्ट, सोबत प्रतिभाताईंचीही साथ

Sharad Pawar

बीड :- जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासाच्या पानावर क्षीरसागर काका – पुतण्यांतला वाद अधोरेखित झाला आहे. भविष्यात त्यांच्यात समेट घडणे अशक्यच आहे. मात्र, काका – पुतण्यांना श्रेष्ठींकडून कसे बळ मिळते यावर पुढची वाटचाल महत्वाची आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांना राजकारणातले दिग्गज काका खासदार शरद पवारांकडून (Sharad Pawar) लिफ्ट केले जात आहे. दुसरीकडे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना काका जयदत्त क्षीरसागर यांना म्हणावे तेवढे बळ सत्तेच्या वर्षभरात तरी मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आणि शिवसेनेला डरकाळी कशी फोडता येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने प्रकाशित केले आहे.

राजकारणात धक्कादायक निकाल घडवून आणण्यात शरद पवार माहिर आहेत. याची प्रचिती जिल्ह्यात दिवंगत नेते सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री असताना गोविंदराव डकांकडून त्यांचा पराभव घडविला होता तेव्हाच आली होती. राजकारणातले ‘लंबी रेस के घोडे’ पारखण्यातही पवारांचा हातखंडाच आहे. म्हणूनच ५० वर्षांपासून अधिक काळ राजकारणात ते वलय टिकवून आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात मुंडें व नंतर क्षीरसागर या दोन मातब्बर राजकारण्यांच्या घरात ‘काका – पुतणे’ अंक घडले. पण, धनंजय मुंडे यांच्या बंडात आणि अलिकडे संदीप क्षीरसागर यांच्या बंडात देखील सुरुवातीला शरद पवार यांची भुमिका तटस्थच होती. पण, सुरुवातीला संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आणि जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर विरोधकांनी बळ दिल्याने खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीच राष्ट्रवादीचे घड्याळ हातचे काढून शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले.

ही बातमी पण वाचा : या नामांतराबद्दल पवारसाहेब कधी बोलणार ?

महायुती सरकारच्या काळात त्यांना उद्धव ठाकरे यांनी अल्पकाळासाठी कॅबीनेट मंत्रीपदाचाही मान दिला. मात्र, त्यानंतर शरद पवारांनी आपल्या हाताची ताकद संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे लावली आणि मातब्बर जयदत्त क्षीरसागर यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या कथित बंडाच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या तंबूत उडी घेत समर्थन दिले. संदीप क्षीरसागरांचा हा निर्णय अजित पवार गटासाठी अनपेक्षित असल्याने सुरुवातीला त्यांना त्रासही सहन करावा लागला.

पण त्यांचा निर्णय आता त्यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचे दिसत आहे. कारण, मागच्या काही काळांपासून शरद पवार व सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची संदीप क्षीरसागर यांच्यावर विशेष मेहरबानी दिसत आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी संदीप क्षीरसागरांसाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट तर मिळवून दिलीच. शिवाय दिल्लीहून मुंबईला स्वत:च्या विमानात सोबत आणले. तसे, पवारांच्या खासगी प्रवासात मंत्र्यांनाही सोबत मिळणे म्हणजे मोठे गिफ्टच असल्याची राजकीय जाणकारांना जाणीव आहे.

एकिकडे क्षीरसागर पुतण्याला मातब्बर काका ‘लिफ्ट’ करत असताना दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सत्तेच्या माध्यमातून वर्षभरात तरी भरीव लिफ्ट मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या कालावधीत जयदत्त क्षीरसागर लिफ्ट होतील असे एखादे मोठे काम, त्यांच्यासोबत कार्यक्रम फारसे दिसलेले नाहीत. शरद पवारांची उद्धव ठाकरेंवरील ‘मर्जी’ आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावरील ‘खप्पा मर्जी’ हे यामागचे इंगित आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने जिल्ह्यात असे चित्र अपेक्षित होते. पण, जिल्ह्यात सत्तेच्या चाव्या हाती असलेल्या राष्ट्रवादीकडून क्षीरसागरांच्या ताटात फार काही पडल्याचे दिसत नाही. तशी, अद्याप जयदत्त क्षीरसागर यांनी अस्वस्थता उघड होऊ दिली नसली तरी भविष्यातील नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत तग धरण्या इतपत बळ पक्षाने अजून तरी दिलेले नाही. जिल्ह्यातील शिवसेनेचीही यापेक्षा वेगळी गत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील जयदत्त क्षीरसागर सध्यातरी लिफ्टविनाच असून असेच सुरु राहीले तर जिल्ह्यातील शिवसेना तरी डरकाळी कशी फोडणार असा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER