साथ सोडणाऱ्या मोहिते पाटील पितापुत्रांना धक्का देण्यासाठी पवारांची मोठी खेळी

Mohite-Patil & Sharad Pawar

पंढरपूर : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या पितापुत्रांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांना त्यांचे जाणे जिव्हारी लागले होते. पण आता सत्तेत आल्यानंतर पवारांनी या पितापुत्रांना शह देण्याची रणनीती आखली आहे.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवडीसाठी पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. डाॅ.धवलसिंहांना विधानपरिषदेवर पाठवून एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. मोहिते पाटलांना संधी दिली तर सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळेल, असा आशावादही नेत्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला.

तेव्हापासून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे पक्षनेतृत्वाची उणीव आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला. पक्षाला अधिक बळकट बनवण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या दृष्टीने तसे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. सध्या डाॅ.धवलसिंह हे विजयसिंह व रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. विधानसभा निवडणुकीत  डाॅ. धवलसिहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यानंतर आता धवलसिंहांच्या रूपाने जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

डाॅ.धवलसिंहांना राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोठ्यातून आमदारकी दिली तर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांबरोबरच माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होतील, अशी आशाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. भाजपात गेलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिहांना राजकीय शह देण्यासाठी मोहिते पाटील घराण्यातीलच डाॅ. धवलसिंहांना राष्ट्रवादीकडून आमदारकीचे बक्षीस दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांना विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण काम करत आहोत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात काम सुरू केले आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच कृषिक्षेत्रातदेखील माझे काम सुरू आहे. आमचे नेते शरद पवार माझा नक्की विचार करतील, त्यांनी संधी दिली तर पक्षवाढीसाठी आपण आणखी जोमाने काम करू, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER