पवारांचा भाजपला मोठा धक्का, लवकरच खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत घोषणा

Sharad Pawar - Eknath Khadse

मुंबई : मागील काही दिवसांपासून पक्षातील काही नेत्यांसोबत नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

खडसे हे मागील अनेक दिवसांपासून पक्षातील काही नेत्यांवर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. यावेळी त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते. परंतु, आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्याप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल’ असं काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सुद्धा, खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं होतं. खडसे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज आहे. वेळोवेळी त्यांची मनधरणी करण्यात आली. बऱ्याच वेळा खडसेंनीच भाजप सोडणार असे संकेत दिले. शेवटी एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER