पवारांचे सभागृहात गैरहजर राहणे म्हणजे मोदी सरकारचे समर्थन नव्हे, हे आहे कारण !

PM Modi-sharad pawar .jpg

मुंबई : अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक अश्या तीन कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत मंजुरी मिळाली. दरम्यान विधेयकाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चेत जे मत मांडलं त्यावरून राष्ट्रवादीचा या विधेयकाला विरोध होता हे स्पष्ट झाले नाही. यावरून एकप्रकारे शरद पवारांनी (Sharad Pawar) या विधेयकाचे समर्थन करत मोदी सरकारला मदत केल्याच्या आरोप होत आहे. विरोधी पक्षात असतानाही असा आरोप होत असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवारांचे सभागृहात गैरहजर राहणे म्हणजे मोदी सरकारचे (Modi Government) समर्थन नव्हे,असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, कृषी विधयेकांवरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारला मदत करण्याची कोणतीही भूमिका पक्षाने घेतलेली नाही. सभागृहातून वॉक आऊट करणे म्हणजे मोदी सरकारला मदत नव्हे. राष्ट्रवादी हा कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे, अशा शब्दांत पाटील यांनी पक्षावर होणारे आरोप खोडून काढले.

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आला होती. त्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी विधेयकावर आपली बाजू मांडली.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, कृषी विधेयकांसाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारे मदत होईल, अशी भूमिका पक्षाने घेतलेली नाही. या विधेयकासंदर्भात पंजाब, हरियाना येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रश्‍न आणि आक्षेप उपस्थित केले आहेत. कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंगला तिथे मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे, त्या राज्यांमध्ये या कृषी विधेयकांचा परिणाम होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजूने कायम उभारणारा पक्ष आहे. त्यामुळे या विधेयकावर सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा दिलेला असे नाही. सरकारी पक्षाला अनुकूल असे कोणतेही पाऊल राष्ट्रवादी कॉंग्रेसने टाकलेले नाही. सत्ताधारी भाजपकडे राज्यसभेतही बहुमताएवढे संख्याबळ आहे. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने हे विधेयक मंजूर करून घेतले, त्याचा आम्ही निषेध करतो. त्या गोंधळात वॉक आउट करणे त्या हा एकच मार्ग होता, असेही जयंत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER