२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व पवारांकडे? प्रशांत किशोर- पवार भेटीत चर्चा?

Sharad Pawar - Prashant Kishor

मुंबई :- निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे आज सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बंददाराआड जवळपास दीड तासांपासून त्यांच्यात चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेतृत्व करण्यावरूनही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर तातडीने दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशांत किशोर आज अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटायला आले. ही राजकीय भेट नाही. वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी ते पवारांची भेट घेत असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही वेळेपूर्वीच दिले आहे. मात्र, गेल्या दीड तासांपासून या दोघांमध्ये खलबतं सुरू असल्याने ही सदिच्छा भेट नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे; शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका आणि पालिका निवडणुका जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढवल्या जाणार आहेत.

त्यामुळे निवडणुकीत काय रणनीती असावी याची पाटील यांनाही माहिती असावी यासाठी पाटील यांना तातडीने सिल्व्हर ओकवर बोलावून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दीड तासांपासून या बैठकीत राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. कोरोना संकटामुळे बदललेली राजकीय परिस्थिती आणि नागरिकांची मानसिकता याविषयीही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राज्यात आणि महाराष्ट्रात बंगाल मॉडेल लागू करता येऊ शकतं का? तसेच राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशात किंवा राज्याराज्यांमध्ये करता येऊ शकतो का? कोणत्या राज्यांमध्ये हा प्रयोग केला जाऊ शकतो? त्यासाठी भाजपविरोधी कोणते राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात, यावरही चर्चा होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तसेच २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार की ममता बॅनर्जी, कुणी नेतृत्व करावं, यावरही चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : वडिलकीचा सल्ला घेण्यासाठी प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला, अजितदादांचे स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button