पवारसाहेब आम्हाला चिंता वाटतेय…

Shailendra Paranjapeमध्यंतरी आम्ही अजित पवार (Ajit Pawar) यांना झालंय तरी काय, असा एक लेख लिहिला होता. हल्ली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जे देशभरातल्या शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणूनही ओळखले जातात, त्यांची विधानंही झालंय तरी काय, असं वाटायला लावणारीच आहेत. कारण पवारसाहेबांची ही ओळख खचितच नव्हती. पवारसाहेब म्हणजे बुद्धिमान राजकारणी, मुत्सद्दी नेते, राजकारणात तेल लावलेले पैलवान आणि कोणत्याही परिस्थितीत आपलं राजकारण यशस्वी करू शकणारे नेते, अशी त्यांची ओळख होती. होती म्हणण्याचे कारण हल्ली काही तरी बिनसलंय की काय, अशी शंका येऊ लागलीय. अलीकडच्या काही वर्षात कुछ तो गडबड है, असं म्हणण्यासारखे प्रसंग वारंवार आलेले आहेत.

ताजं उदाहरण म्हणजे देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विधानावर पवारसाहेबांनी व्यक्त केलेले मत. गोगोई यांनी न्यायव्यवस्थेबद्दल नुकतंच एक मत व्यक्त केलं. न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून तिथे न्याय मिळत नाही आणि त्यामुळे मी न्यायालयाकडे जाणार नाही, अशा आशयाचं विधान गोगोई यांनी केल्याचं गेल्या आठवड्यात वृत्तपत्रातून वाचनात आलं होतं. गोगोई राज्यसभेचे खासदारही आहेत. हल्ली वर्तमानपत्रात आलं होतं किंवा टीव्हीवर दाखवलं होतं, असं सांगावं लागतं कारण एखादी व्यक्ती मुळात काय बोललीय, ते कळण्याचे फारच कमी मार्ग सर्वसामान्य पामरांना उपलब्ध असतात. पण गोगोई यांनी व्यक्त केलेल्या मतावर पवारसाहेब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामधे पत्रकारांशी बोताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिला आहे, असे बातम्यांमधून आले आहे.

पवारसाहेबांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गोगोई यांचं विधान चिंताजनक आहे आणि या विधानामुळे सर्वांना चिंता वाटेल, असंही पवार यांचं म्हणणं आहे. गेल्याच आठवड्यात न्यायव्यवस्था उच्च आहे, असं माझ्या वाचनात आलं होतं आणि न्यायव्यवस्था उच्च असल्याचं पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी न्यायाधीशांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितलं होतं. त्यामुळे गोगोई आपल्यापरीने सत्य सांगताहेत का, हे मला माहीत नाही पण त्यांचे विधान सर्वांनाच चिंता वाटावी, असे आहे, असं पवार यांनी सांगितलंय.

पवारसाहेब मुरब्बी राजकारणी आहेत पण हल्ली जरा गडबड होतेय का, असं वाटावं असंच हे विधान आहे. कारण प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान तर न्यायव्यवस्था उच्च आहे असं म्हणताहेत आणि गोगोई तर ती जीर्ण आहे, असं म्हणताहेत, याकडे पवारसाहेब अंगुलीनिर्देश करताहेत. पण मुळात एखादा नोकरशहा म्हणजे निवृत्त सचिव किंवा निवृत्त सरकारी नोकर नोकरीत असेपर्यंत आपापल्या खात्यात भ्रष्टाचार आहे, असं कधीच म्हणत नाही पण नोकरी संपली की दुसऱ्या दिवशी ही सारी व्यवस्था कशी किडलेली आहे, हे सांगू लागतो. असे अनेक निवृत्त नोकरशहा पवारसाहेबांना चांगलेच माहीत आहेत. काही त्यांच्या पक्षातून लोकप्रतिनिधी झाले आहेत. काही अनेक वर्षे त्यांच्या निकटच्या वर्तुळात आहेत आणि त्यात सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी यांसह अनेक खात्यांमधल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात तीनदा मंत्री होते आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आजही अनेक अधिकारी आहेतच. पण निवृत्तीनंतर व्यवस्थेला शिव्या देणारे काही गोगोई पहिली व्यक्ती नाही.

मग पवारसाहेबांनी ही प्रतिक्रिया का व्यक्त केली असावी…हा प्रश्न येतो. केंद्रातले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले सरकार भक्कम आहे. लोकसभेच्या तीनशेपेक्षा जास्ती जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सत्ते आलाय आणि सध्या निवडणुका नक्कीच नाहीत. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकार बँकफूटवर आहेच आणि म्हणूनच आणखी एक काडी टाकणं, इतकाच या प्रतिक्रियेचा हेतू दिसतो. अर्थात, पवार वगळता अन्य कोणत्याही मोठ्या नेत्यांनी गोगोई यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलेली वाचनात आलेली नाही. कदाचित पवार यांच्यानंतर रांगेने प्रतिक्रिया येतीलही पण पवारसाहेबांच्या प्रतिक्रियांबद्दल हल्ली काही कळेनासं झालंय. म्हणूनच मग पवारसाहेबांची प्रतिक्रिया बघून कोणालाही वाटो न वाटो, आम्हाला मात्र चिंता वाटू लागलीय. आम्हाला माहीत असलेले पवारसाहेब हे नक्कीच नाहीत.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं सावज टप्प्यात आल्यावर मारतो, हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलं होतं. त्यांचा नेम चुकला आणि त्यांचीच उचलबांगडी झाली होती. तसंच काहीसं हल्ली पवारसाहेबांबद्दल वाटतंय. पवारसाहेब नेम धरताहेत पण सावज टप्प्याबाहेरच आहे की काय, अशी शंका येते.

महाराष्ट्रात पवारसाहेबांनीच सत्ता आणली आणि तीही पुढच्या पिढीतल्या भाजपाच्या नेत्यांशी लढून. हल्ली त्यांना चंद्रकांत पाटील, देवेन्द्र फडणवीस, पीयूष गोयल अशा नेत्यांबद्दल त्यांच्या खास शैतील मतं व्यक्त करावी लागतात. आम्हाला माहीत असलेले हे पवारसाहेब नव्हेत. त्यामुळेच त्यांच्या गोगोई यांच्याबद्दलच्या प्रतिक्रियेवरून चिंता वाटतेय.

शैलेन्द्र परांजपे 

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER