राजकीय वैर बाजूला ठेवत रोहित पवार- सुजय विखे एकत्र येणार?

Sujay Vikhe - Rohit Pawar

अहमदनगर : राज्याच्या राजकारणात विखे आणि पवार कुटुंबातील असलेले राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्यांची तिसरी पिढी मात्र राजकीय वैर बाजूला ठेवत एका कामासाठी एकत्र येणार आहे. तशी इच्छा भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी बोलून दाखवली आहे. तर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र ते नक्कीच एकत्र येतील अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

कर्जत शहरातील बायपास रस्त्याचा प्रश्न सध्या चांगलाच गाजत आहे. कर्जत-बारामती रस्त्याच्या रुंदीकरणाच काम सध्या सुरू आहे. यासाठी कर्जत शहरातील काही गाळे पाडावे लागणार आहेत. त्यामुळे तसे न करता शहराला सुमारे ४० किलोमीटरचा बायपास करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विखे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडाही तयार केला आहे. यातून गाळेधारकांना दिलासा मिळणार असला तरी अन्य व्यापारी आणि ज्यांच्या शेतातून बायपास जाणार आहे, त्यांच्याकडून विरोध करण्यास सुरूवात झाली आहे. शेत जमीन जाणार आणि बायपास झाल्यावर शहरातील बाजारपेठ ओस पडणार असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. पवार लवकरच कर्जतला येऊन यासंबंधी बैठक घेणार आहेत.

तत्पुपूर्वी डॉ. विखे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी सामोपचाराची भूमिका घेत रोहित पवारांना सोबत घेऊन हे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. विखे म्हणाले, ‘विखे-पवारांच्या राजकीय भांडणात अनेकांनी आपले घर बांधले आहेत. आम्ही कधीच एकत्र येत नाहीत असे आतापर्यंतचे राजकारण सांगते. ते राज्याने पाहिले आहेच. पण असाच संघर्ष कर्जतच्या बायपाससंबंधी झाला तर गाळेधारक संकटात येतील. तसे होऊ नये यासाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊ. एकत्र बसून सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊ. आम्हा दोघांनाही लोकांनी विकासासाठी निवडून दिले आहे. अशा परिस्थिती चुकीचे निर्णय घेऊन कोणाचे संसार उद्ध्वस्त झाले तर लोक आम्हालाच जबाबदार धरून प्रश्न विचारतील. हाच का तुमचा विकास, असा सवाल करतील. त्यामुळे एकत्र येऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.’

आता विखे यांनी घेतलेल्या निर्णयावर रोहित पवार सकारात्मक भूमिका का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही या दोघांनी एकत्र येण्याचा विचार बोलून दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र, अद्याप तरी तसे घडलेले नाही. आता या कामाच्या निमित्ताने आपले राजकीय वैर बाजूला ठेवत प्रश्न सोडविला जातो की ताणला जातो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER