राजकीय जुगलबंदी रंगणार? पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

Uddhav Thackeray - Sharad Pawar - Devendra Fadnavis - Raj Thackeray

मुंबई :- शिवाजी पार्क, काळा घोडा, रिगल सिनेमा की गेट वे ऑफ इंडिया अशा तीन ते चार स्थळांची चाचपणी झाल्यानंतर अखेरीस गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस (Mumbai Police) मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. कितीतरी वर्षांनंतर हे चारही नेते एकाच मंचावर येत असल्याने राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) व नगरसेवक सचिन पडवळ यांनी पवार, राज, फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांना अनावरण सोहळ्याची निमंत्रणे मंगळवारी त्यांच्या घरी जाऊन दिली. या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्ये मतभेद होते. दरम्यानच्या काळात जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. परंतु हा प्रस्तावही बारगळला. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला.

दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या भागात पुतळा उभारू नये, अशी मागणी दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. पुतळ्यामुळे येथील वाहतूककोंडीत आणखी वाढ होईल, असे संघटनेने म्हटले होते. मात्र सेनेने हे फार गांभीर्याने न घेता अखेर याच ठिकाणी पुतळा उभारला आहे. या पुतळ्यासाठी सर्व सरकारी परवानग्या घेऊन काम पूर्ण केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’ कधी?; शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER