कडक शब्दात पवार आयुक्तांना म्हणाले, ‘ही इंजेक्शने केवळ गरीब रुग्णांसाठी वापरावीत’

Sharad Pawar

पुणे : पुण्यात (Pune) वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांचा मृत्यू झाला. या घटनेला गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहराला ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना (Corona) वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांचे कानही टोचले.

पिंपरी मधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जात आहेत, हा महत्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. “तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही अनेक बाबी समोर येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला.

जंबो रुग्णालयात डॉक्टर, रुग्णवाहिकेचे नियोजन व्यवस्थित करावे. पुण्यात पत्रकाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. कोणाचाही असा मृत्यू होता कामा नये. राज्य सरकारकडून काही मदत लागली तर सांगा. आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.

त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना उपाययोजनांविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ‘समजा, माझ्यासारखी वयोवृद्ध व्यक्ती करोनाबाधित झाल्यास तुम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या किती व्यक्तींचे ट्रेसिंग करता?’ त्यावर आयुक्तांनी ‘चौदा व्यक्तींचे’ असे उत्तर दिले. त्याविषयी नाराजी व्यक्त करून ‘किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा. टेस्टिंगची संख्या वाढवा,’ अशी सूचना त्यांनी या वेळी केली.

करोना रुग्णांसाठी सद्यःस्थितीत वरदान ठरणारी रेमडेसिवरची पन्नास इंजेक्शने शरद पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपुर्द केली. ‘करोनाबाधित गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही इंजेक्शने वापरावीत,’ अशी सूचना त्यांनी केली. यापूर्वीदेखील पवार यांनी पन्नास इंजेक्शने उपलब्ध करून दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER