
पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) गेले होते; मात्र त्याच मैदानावर आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे पवारांनी पाहिलेसुद्धा नाही, असा आरोप मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राजेंद्र कुंजीर (Rajendra Kunjir) यांनी केला. पुणे येथे पत्रपरिषदेत कुंजीर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने डोळ्यावर आणि कानावर हात ठेवले आहेत. सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा आरक्षण दिले की, लगेच न्यायालयात याचिका दाखल केली जाते.
कोणत्याही समाजाबद्दल आमच्या मनात द्वेष नाही. नियुक्त्या रखडलेल्या आहेत, म्हणून आझाद मैदानावर एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यात सरकारने सरकारी भरतीचा घाट घातला आहे. मराठा आरक्षणावर दि. ५ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर नजर ठेवणार आहोत. निकाल बाजूने लागला तर स्वागत करणार आहोत. विरोधात गेला तर सर्वानुमते पुढील निर्णय घेऊ.
४ ला मराठा संघर्ष यात्रा
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून न्यायालयात त्याला स्थगिती मिळाली आहे. दि. ५ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी दि.४ रोजी पुणे ते साष्ट पिंपळगाव अशी ‘मराठा संघर्ष यात्रा’ आयोजित केली आहे. दि. ४ रोजी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात होईल. दि. ५ रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला