शरद पवारांनी पटेल-दाऊद टोळी संबंधांबाबत उत्तर द्यावे : भाजपाची मागणी

Sharad Pawar Praful Patel

मुंबई : माजी नागरी विमान वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इमब्राहीमचा साथीदार इक्बाल मेमन उर्फ मिर्च याच्याशी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने हा तपास सुरु केला आहे. याप्रकरणावरून आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जाब विचारला आहे .

आर्थिक व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने स्पष्टीकरण द्यावे. ते संबंध केवळ पटेल यांच्या एका व्यवहारापुरते की राष्ट्रवादी काँग्रेस व दाऊद टोळीमध्ये आणखी काही लागेबांधे आहेत याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जनतेला दिले पाहिजे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी केली.

दरम्यान पटेल यांच्या कुटुंबीयांच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने इक्बाल मेमनला एक प्लॉट दिला होता. वरळीतील नेहरु तारांगण या प्राईम लोकेशन परिसरातील हा प्लॉट आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली सीजे हाऊस नावाची इमारत बांधली आहे.

प्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित पटेल यांची कंपनी आणि इक्बाल मेमन यांच्यामध्ये एक करार झाला. त्यानुसार इमारतीच्या बदल्यात दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले. या दोन मजल्यांची किंमत जवळपास २०० कोटी रुपये आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीच्या भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना ईडकडून बोलावले जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.