पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, अजित पवारांचा विरोधकांना टोला

Ajit Pawar-Sharad Pawar

रायगड : नुकताच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील अनेकांच्या घरांची पडझड झाली, फळबागा उद्धवस्त झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन योग्य मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज नुकसाग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना टोला हाणला. शरद पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला हाणला.

यावेळी अजित पवार म्हणाले, कोकणातील ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा लाभला आहे, महाडचं चवदार तळंही याच जिल्ह्यात आहे. सी. डी. देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला ४ जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा आहे. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे या भूमीबद्दल पवारांच्या मनात प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. कोकणात 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलं तर शून्य टक्के व्याजदर असेल. राज्य सरकार शून्य टक्के व्याजदराने पैसे उपलब्ध करुन देण्यात येईल. मुंबई गोवा महामार्गावर वन विभागाची अडचण आहे. त्यामुळे काम रखडलं, आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात साताऱ्यात एकाच दिवशी ४० किलोमिटरचा रस्ता तयार केला, असं अजित पवारांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या भागात पाच वर्षात चार वादळं आली. सरकार आपल्या पाठिशी खंभीरपणे उभे आहे. केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीनपट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कुणालाही वाटलं नव्हतं की महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येईल स्थापना होईल आणि आपलं सरकार येईल. पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. १४ महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला. कोरोना कसा हल्ला करेल हे सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आतताईपणा जीवावर बेततोय, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

चक्रीवादळाने बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली. मात्र आता पावसाळ्यात चौपट झाडं लावा. १०० वर्षापूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री संकल्पना राबवा. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल. वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा. बीचवर गझीबो टेंट लावले जाणार, असं अजित पवार म्हणाले.

आपल्या अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कामं करुवून घेतात. अदिती माझी मुलगी, पै पै कामासाठी खर्च झाले पाहिजे, असा प्रेमल दम यावेळी अजित पवारांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अदिती तू मला बोलवलंस, पण काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो, असं अजित पवार म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button